नागपूर : दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यास आज मंगळवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी नागपुरात दुपारपर्यत विशेष प्रतिसाद मिळाला नाही.भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा बँकेतून बदलून मिळण्याची ३० सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. नोटा बदलून घेण्यास आजपासून सुरुवात झाली. मात्र, शहरातील विविध बँकांचा फेरफटका मारला असता नोटा बदलण्यासाठी पहिल्या नोटबंदीप्रमाणे कुठेही आज सकाळी १० ते ११ वाजेरम्यान रांगा लागल्याचे दिसून आल्या नाहीत. नोटा बदलण्यास अल्पप्रतिसाद असल्याचे बँकेचे कर्मचारी सांगत होते. स्टेट बँक ऑफ इंडिया, युको बँक, कॅनरा बँक, एचडीएफसी, अक्सिस बँक, कर्नाटक बँक, इंडियन बँक यांच्या समोर नोटा बदलण्याची गर्दी नव्हती.
२०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलणातून काढून घेण्याची घोषणा रात्री ८ वाजता केली होती. त्यानंतर त्या बदलण्यासाठी मोठी रीघ बँकासमोर दिसत होती. रांगेत उभे राहून काहीचे प्राण देखील गेले होते. अचानक नोटाबंदीचा निर्णय घेतल्याने मोदी यांच्यावर टीका झाली होती. नंतर ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटांऐवजी २ हजाराच्या नोटा चलनात आणण्यात आल्या. आधीपेक्षा अधिक मूल्यांची नोटा आणल्याने काळा पैसा गोळा करण्याची संधी मिळणार अशी टीका त्यावेळी झाली. तसेच नोटेबाबत पहिल्या दिवशीपासून संभ्रम होता. अखेर २०१९ मध्ये या नोटांची छपाई बंद करण्यात आली.आणि त्या नोटा चलण्यातून हद्दपार करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला.