Raj Thackeray : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार, शिवसेना (उभाठा)चे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंपाठोपाठ आता राज ठाकरे यांचेही भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले फलक गोंदिया जिल्ह्यात झळकले आहे. मनसे कार्यकर्त्यांनी लावलेल्या या फलकांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर केली नसली तरी महाराष्ट्र राज्याला विधानसभा निवडणुकीची चाहूल लागलेली आहे आणि त्याकरिता प्रत्येक पक्षाने आपापली पक्ष बांधणी, मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे. या अंतर्गत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गोंदिया जिल्हा दौरा बुधवार २१ ऑगस्ट रोजी होणार आहे. या दरम्यान त्यांच्या स्वागताकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गोंदिया जिल्ह्यातील पदाधिकारी व त्यांच्या समर्थकांनी लावलेल्या स्वागत फलकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री, असा उल्लेख केलेला आहे. यापूर्वीही महाराष्ट्रात आपापल्या वाढदिवसानिमित्त आपल्या पाठीराख्या व समर्थकांकडून भावी मुख्यमंत्री म्हणून फलक लावल्याचे दिसून आले आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) गटाचे सुप्रिया सुळे, जयंत पाटील, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शिवसेना (उभाठा)चे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फलक महाराष्ट्रातील त्यांच्या पाठीराख्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त वेळोवेळी लावल्याचे दिसून आले आहे, पण आता महाराष्ट्रातील विधानसभेच्या २२५ ते २५० जागांवर निवडणूक लढण्याची घोषणा करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समर्थकांनी पण त्यांच्या गोंदिया जिल्हा दौऱ्यानिमित्त फलकावर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे.
हेही वाचा – अन्… मस्की दाम्पत्यांनी स्वत:ला साखळी बेड्यामध्ये जखडून पिंजऱ्यामध्ये बंद करुन घेतले
सद्या ही बाब काहीशी तर्कसंगत वाटत नसली तरी राजकारणात शक्य अशक्य असं काहीच नसते याची प्रचिती मागील २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर आलेली आहे. निवडणूक निकालात आकड्यांचा खेळ फसला असल्याचे लक्षात येताच त्यावेळी संयुक्त शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपदाची संधी असल्याचे हेरून केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत बंद दाराआड झालेल्या चर्चेचे कारण सांगून भाजपसोबत काडीमोड घेत काँग्रेस आणि तत्कालीन संयुक्त राष्ट्रवादीची साथ घेत मुख्यमंत्रीपद अडीच वर्षांपर्यंत उपभोगले असल्याचे आपण बघितलेच आहे. तसेच देशाने पण झारखंड राज्यात मधु कोडा यांच्या रुपाने एक अपक्ष आमदाराला १८ सप्टेंबर २००६ रोजी झारखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आरूढ होतानाचा इतिहास आहेच.
हेही वाचा – ना सेल्फी, ना फोटो, ना मोबाईल… तरीही पक्ष कार्यकर्त्यांना मिळणार प्रशिक्षण
अपक्ष उमेदवार म्हणून मुख्यमंत्री होणारे मधु कोडा हे भारतातील कोणत्याही राज्याचे पहिले मुख्यमंत्री राहिल्याचा इतिहास आहेच. याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुती या दोन आघाड्यांतील सहा पक्षांचा अधिक जागा मिळविण्याचा प्रयत्न आणि या करिता होणारी सध्याची रस्सीखेच आणि विधानसभा निवडणुकीत होणाऱ्या कुरघोडीचा अंदाज घेतल्यास महाराष्ट्र विधानसभेच्या निकालात महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांदरम्यान आकड्यांचा खेळ भविष्यात फसल्यास आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २२५/२५० पैकी काही अपेक्षाअनुरूप जागांवर विजय मिळवल्यास राजकारणात काहीही अशक्य नसल्यासारखे परिणाम आपल्याला भविष्यात दिसू शकतात हीच बाब हेरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गोंदिया जिल्ह्यातील पाठीराख्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वागतानिमित्त लावलेल्या फलकांवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. त्यात आजघडीला गैर काहीच नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.