भंडारा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त काल रात्री दि. ३ जून रोजी भंडारा शहरासह जिल्ह्यात मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. यात सर्व बॅनर्सवर नाना पटोले यांचा ‘महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध नेत्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून उल्लेख असलेले बॅनर लागताना पाहायला मिळत आहे. यात आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भर पडली आहे. भंडाऱ्याचे सुपुत्र आणि साकोली विधान सभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांचा उद्या ५ जून रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाचा उत्साह आणि जल्लोष भंडारा येथील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात संचारला असून बॅनर बाजी करून त्यांनी तो व्यक्त केला आहे.
हेही वाचा >>> आटपाडीतील देशमुखांचे संस्थान खालसा
भंडारा शहरातील जिल्हा परिषदेच्या आवर भिंतीवर नाना पटोलेंच्या बॅनरवर त्यांचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात आला आहे. शहरातच नाही तर सर्वत्र हे होर्डींग्ज झळकले आहेत. जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती मदन रामटेके, शिक्षण व आरोग्य सभापती रमेश पारधी , पवन वंजारी व काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनीत देशपांडे यांनी जिल्हा हे शुभेच्छा बॅनर लावून त्यावर नाना पटोले यांना भावी मुख्यमंत्री असे लिहून शुभेच्छा दिल्या आहेत. नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नाना पटोले यांच्या घरापासून साकोली लाखनी या त्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बॅनर बाजी करण्यात आली आहे.
याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर विविध ठिकाणी लावण्यात आले होते. यांच्या पाठोपाठ आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख होऊ लागल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे महविकास आघाडीमध्ये चर्चा बैठकांचा सपाटा सुरू असताना काँगेस, राष्ट्रवादी आणि आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलेले बॅनर मात्र चर्चेचा विषय ठरले आहेत. या बॅनर्समुळे राजकीय गोटात विविध अंदाज वर्तवण्यास सुरुवात झाली असून राजकीय वर्तुळात पुन्हा नव्या चर्चांना उधाण आले आहे.