नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत लिहिणे, बोलणे धाडसाचे काम आहे. कारण ते व्यक्तिमत्त्वच दुर्लभ आहे, असे प्रतिपादन माजी राज्यपाल बनवारीलाल पुराेहित यांनी केले.
मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘राजयोगी’ या शुभांगी भडभडे लिखित कादंबरीचा प्रकाशन सोहोळा पद्मगंधा प्रतिष्ठानच्यावतीने रामनगरमधील श्रीशक्तीपीठ येथील लक्ष्मी सभागृहात शनिवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्घाटक म्हणून पुरोहित बोलत होते. अध्यक्षस्थानी लेखक डॉ. कुमार शास्त्री आणि प्रमुख अतिथी म्हणून भाजप प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, आशुतोष अडोणी उपस्थित होते.
यावेळी पुरोहित म्हणाले, मोदींवर इतकी चांगली कादंबरी लिहिली जाऊ शकते, याचे आश्चर्य आहे. भारत त्यांच्या नेतृत्वात प्रगती करत आहे. शिवराय कुळकर्णी म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळून आता ७८ वर्षे पूर्ण होतील. स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात मोदी पंतप्रधान झालेत. हा एक सुवर्णकाळ आहे. आशुतोष अडोणी यांनीदेखील या कादंबरीवर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणे हा अतिशय आनंददायी क्षण होता आणि त्यांच्यावर लिहिलेली कादंबरी प्रकाशनापूर्वी त्यांना सोपवणे हा सौभाग्याचा क्षण होता, असे प्रतिपादन शुभांगी भडभडे यांनी केले. या कादंबरीचा इंग्रजी व हिंदी अनुवाद लवकरच करण्यात येईल. तसेच या पुस्तकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रस्तावना असल्याचेही त्यांनी सांगितले.