स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात झाली असली तरीही कलहंस या पक्ष्याच्या एकेरी आगमनाने सर्वच पक्षीप्रेमींना बुचकाळ्यात टाकले आहे. साधारणपणे हिवाळ्यात स्थलांतर करून येणारे पक्षी समूहाने येतात. कलहंस हा पक्षीसुद्धा समूहाने, पण प्रामुख्याने बार हेडेड गुज या पक्ष्याच्या थव्यांच्या मागे समूहाने येतो. यावेळी मात्र त्याचे एकेरी आणि सर्वात पहिले झालेल्या स्थलांतरणाचे कोडे अजूनही पक्षी अभ्यासकांना उलगडलेले नाही.
विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या तलावसंपन्न जिल्ह्य़ातील तलावांवर हिवाळ्यात होणारे विविध पक्ष्यांचे स्थलांतरण म्हणजे पक्षी अभ्यासकांसाठी पर्वणी असते. दरवर्षी या स्थलांतरणात नव्या पक्ष्यांची भर किंवा नव्या नोंदी घेण्यासारखे काहीतरी घडत असते. यावेळी नागपूर जिल्ह्यातील कलहंस(ग्रे लेग गुज) चे स्थलांतरण सर्वच पक्षी अभ्यासकांना बुचकाळ्यात टाकणारे आहे. वजनाने खूप मोठय़ा असलेल्या या पक्ष्याचे स्थलांतरण सर्वात शेवटी होते. आजपर्यंत जितक्यांदा तो स्थलांतर करून आला त्यातील ९५ टक्के वेळा तो बार हेडेड गुज या पक्ष्यांच्या थव्यांच्या मागेच आलेला आहे. बार हेडेड गुज या पक्ष्यांचे आगमन नोव्हेंबरच्या मध्यान्हानंतर होते, असे समजले जात असले तरीही २५ नोव्हेंबरच्या आत तो कधी आलेला नाही. देहरादूनमधील एका पक्षी अभयारण्यातसुद्धा हे पक्षी ११ ऑक्टोबरदरम्यान येतात, पण तेथेही अद्याप त्यांचे आगमन झालेले नाही. त्यामुळे बार हेडेड गुजच्या मागोमाग येणारा हा कलहंस एकटा आलाच कसा, असा प्रश्न पक्षी अभ्यासकांना पडला. विशेष म्हणजे, आकाराने आणि वजनाने मोठे असलेले कोणतेही पक्षी अजून आलेले नाहीत. त्यामुळे कलहंसचे असे एकेरी येणे आश्चर्यासोबतच अभ्यासासाठी पर्वणीसुद्धा ठरले आहे. पक्षी निरीक्षक अविनाश लोंढे व त्यांच्या सहकाऱ्यांना सुरुवातीला तो जखमी असेल आणि त्यामुळे तो भटकत आला असेल, असे वाटले. त्यादृष्टीने कलहंसचा अभ्यास केल्यानंतर असे काहीही त्यांना आढळले नाही. त्यानंतर दुसऱ्या पक्ष्यांच्या समूहासोबत तो भरकटला असेल, असे त्यांना वाटले, पण तसेही काही नव्हते. साधारपणे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात त्यांचे आगमन सौंदड, नवेगाव, गोठणगाव, झिलमिली आदी ठिकाणी होते. मात्र, नागपूर परिसरात अलीकडच्या दोन दशकात तरी तो आलेला नाही. कलहंस या पक्ष्याचा नागपुरातील हा पहिले छायाचित्र असलेला रेकॉर्ड असून रोहीत चरपे या पक्षी निरीक्षकाने ही नोंद घेतली. नागपूर परिसरातील मिहानमधील तेल्हारा तलावावरच्या त्याच्या एकेरी आगमनानंतर दोन दिवसापूर्वी दहेगाव तलावावर या पक्ष्याची जोडी दिसून आल्याचे पक्षीमित्रांनी सांगितले.

‘ग्रे गुज’चा ‘ग्रे लेग गुज’ कसा झाला?
हंस कुळातील ठिपके, तसेच रेषा असलेला राखाडी पांढऱ्या रंगाचा व गुलाबी-शेंदरी रंगाच्या चोचीचा अन् पायाचा पाणपक्षी असून लांबी ७४ ते ९१ सें.मी. पर्यंत व वजन ३.३ किलोपर्यंत असते. स्थलांतरित पक्षात भारतात सर्वात शेवटी येणारा हा पक्षी आहे. इंग्रजीतील त्याचे नाव ग्रे गुज असून स्थलांतरणात तो बार हेडेड गुजच्या मागे राहात असल्याने त्याचे नामकरण ग्रे लेग गुज, असे झाले आहे. पाळीव हंस तयार करण्याच्या प्रक्रियेतील हा महत्त्वाचा आणि मुख्य घटक आहे.

Story img Loader