नागपूर : बार्टी, सारथी आणि महाज्योती या तिन्ही संस्थांमध्ये पीएच.डी. अधिछात्रवृत्तीसाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेमध्ये गोंधळ समोर आला आहे. चाळणी परीक्षेमध्ये पुणे विद्यापीठाची २०१९ची ‘सेट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका जशास तशी छापून उमेदवारांना देण्यात आल्याने परीक्षा पद्धतीविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. आता ही परीक्षाच रद्द करून दुसऱ्यांदा घ्यावी अशी मागणी होत आहे. राज्यात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी टीआरटीआय, अनुसूचित जाती व नवबैद्धांसाठी बार्टी या संस्था कार्यरत आहेत. त्याच धर्तीवर अलीकडे ओबीसींसाठी महाज्योती, मराठा, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा समाजाकरिता सारथी, खुल्या प्रवर्गातील दुर्बल घटकांसाठी अमृत अशा आणखी काही संस्थांची निर्मिती करण्यात आली. या सर्वच संस्थांच्या वतीने त्या त्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रामुख्याने अधिछात्रवृत्ती, परदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती, एमपीएससी, यूपीएससी, बॅंकिंग, रेल्वे व इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी प्रशिक्षण योजना राबवण्यात येतात.
परंतु प्रत्येक संस्थेची विद्यार्थी संख्या, इतर निकष वेगवेगळे असल्याने त्यात सुसूत्रता आणण्यासाठी एकसमान धोरण निश्चित करण्यात आले. त्यानुसार बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या प्रत्येकी पीएच.डी.च्या २०० जागांच्या अधिछात्रवृत्तीसाठी रविवारी सकाळी चाळणी परीक्षा घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर आणि पुणे या विभागाच्या ठिकाणी ही परीक्षा घेण्यात आला. परीक्षेला सारथीच्या १३२९, महाज्योतीच्या १३८३ आणि बार्टीच्या ७६१ अशा ३४७३ पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. परीक्षेची जबाबदारी ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागावर होती. परंतु विद्यापीठाने २०१९ सालाचा ‘सेट’ परीक्षेचा पेपर तसाच छापून रविवारी चाळणी परीक्षेदरम्यान दिला. त्यामुळे परीक्षा नियोजन आणि शासनाच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा >>>नातेवाईक-परिचित व्यक्तीकडून सर्वाधिक बलात्कार; राज्यात २३३६ महिलांवरील बलात्कारातील आरोपी ओळखीचे
विद्यापीठाकडून माहिती देण्यास टाळाटाळ
परीक्षेतील गोंधळासंदर्भात विचारणा करण्यासाठी पुणे विद्यापीठाचे कुलसचिव व प्र-कुलगुरू यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या विषयावर माहिती नसल्याचे कारण देत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.