ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील राजा हा पट्टेदार वाघ आहे. वाघाचा या प्रकल्पात अक्षरशः दबदबा आहे. मात्र, ताडोबातील रुद्रा व बलराम या दोन वाघांमध्ये अस्तित्वाची लढाई सुरू आहे. मागील अनेक दिवसांपासून या दोघांमध्ये ही लढाई सुरू असली तरी रविवारी झालेल्या लढाईची समाज माध्यमावर चर्चा आहे.
हेही वाचा >>>नागपूर : आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहरली वन परिक्षेत्रातील जंगल परिसरातील कोअर झोनमध्ये बलराम आणि रुद्र या दोन वाघामध्ये रविवारी ही लढाई झाली. रविवारी सकाळच्या सुमारास ही लढाई ताडोबात आलेल्या अनेक पर्यटकांनाही बघायला मिळाल्याने ते आनंदित झाले. ताडोबातील वाघांमुळे देश-विदेशातील पर्यटक जगप्रसिद्ध ताडोबाकडे आकर्षित होत आहेत.
हेही वाचा >>>काँग्रेस नेते अनंतराव देशमुख आज भाजपात प्रवेश करणार; वाशीम, अकोला जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार
एका वाघाला जंगलात वावर करण्यासाठी ४० ते ५० चौरस किमी परिसर लागतो, असे अभ्यासकांचे मत आहे. वाघ एखाद्या भागात असेल आणि त्या ठिकाणी दुसरा वाघ त्याच्यावर भारी पडला तर लढाई जिंकणारा वाघ हा त्या परिसराचा राजा असतो. तो त्या परिसरावर आपले वर्चस्व निर्माण करीत असतो. दुसरा वाघ आपले वावर क्षेत्र सोडून दुसरीकडे वर्चस्व निर्माण करीत असतो. तर काही वाघ वाघीणीच्या प्रेमासाठी सुध्दा लढाई करीत असल्याचे वन्य जीव अभ्यासक सांगतात. कोअर झोनमध्ये असलेल्या ताडोबातील माया वाघिणीचे मन जिंकण्यासाठी बलराम आणि रुद्र यांच्यात लढाई झाली असल्याचे काही जाणकारांकडून सांगितले जात आहे. या लढाईत बलराम विजयी ठरला असल्याचेही सांगितले जातेय. या लढाईत दोन्ही वाघ भयंकर जखमी झाले. त्यामुळे बलराम हा ताडोबातील पंचधारा भागात गेला. तर रुद्र येनबोडीच्या दिशेने गेल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, ही लढाई माया वाघिनीसाठी झाली की परिसरातील अस्तित्वासाठी याची चर्चा पर्यटकांमध्ये रंगली आहे.