नागपूर : मुख्यमंत्री बदलणार असल्याचे काही विरोधी पक्षातील नेते बोलत असले तरी देवेंद्र फडणवीस आणि आमच्या शीर्ष नेतृत्वाने व अजित पवार यांनी २०२४ पर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार असल्याचे स्पष्ट केले असून बदलण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र, काही विरोधी पक्षाच्या नेत्यांचा महायुतीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा उद्योग सुरू असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
राज्यातील घडामोडी बघता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या देवगिरीमध्ये रात्री बैठक झाली. त्यानंतर बावनकुळे प्रसार माध्यमांशी बोलत होते. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर मुख्यमंत्री बदलणार म्हणून विरोधी पक्षातील काही नेते संभ्रम निर्माण करत आहेत. मात्र, २०२४ पर्यंत एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री राहणार आहेत. याबाबत कोणीही गैरसमज करून घेऊ नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी झाल्यानंतर आमच्यामध्ये कुठलीही अस्वस्थता नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही फूट पाडली नाही. आम्हाला कोणाचा पक्ष फोडण्यात काही रस नाही. आमच्या पक्षात कुठेही अस्वस्थता नाही. आम्ही विरोधी पक्षात होतो आणि विरोधी पक्षातून आम्ही सत्तेत आलो. फडणवीस एक पाऊल मागे आले आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले, असे बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मूळ नाव माहित आहे काय ?
सध्या जागा वाटपाचा प्रश्नच नाही. जेव्हा निवडणुका लागेल तेव्हा जागा वाटपावर चर्चा होईल. आज केवळ सरकार राज्यासाठी किती सक्षम आहे, जनतेला पुढच्या काळात काय मिळणार आहे हे महत्त्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला साथ देण्यासाठी अजित पवार आमच्यासोबत आले आहेत. त्यामुळे आमच्या आमदारांना मंत्रीपद मिळो ना मिळो, आमच्यासाठी देशहित महत्त्वाचे आहे. नवीन मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अजित पवार एकत्र बसतील आणि ते ठरवतील, असेही बावनकुळे म्हणाले.