नागपूर : विरोधी पक्षातील सर्व नेत्यांना त्यांच्या पुढच्या पिढीची चिंता आहे, देशाची नाही, त्यामुळे पाटणामध्ये भाजपा विरोधात सर्व विरोधी पक्षातील नेते एकत्र आले आहेत. देशातील जनतेला सर्व माहिती असल्यामुळे तेच आगामी निवडणुकीत त्यांची वज्रमुठ सैल करणार, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
बावनकुळे येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते. यापूर्वी २०१४ व २०१९ मध्ये सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते मात्र त्यांची मुठ सैल होत गेली आणि देशात मोदींचे वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे. आताही पाटणामध्ये सर्व विरोधी पक्षांचे नेते एकत्र येत आहेत. मात्र नेत्यांना देशाची चिंता नाही. नरेंद्र मोदी २०२४ मध्ये सत्तेमध्ये आले तर आपल्या पुढल्या पिढीचे काय होणार याची चिंता त्यांना आहे. शिवाय ज्यांनी गैरव्हवहार केले ते सर्व उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सर्वच नेते भीतीपोटी एकत्र आले आहेत, असे बावनकुळे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची मान जगभरात उंच करत आहेत. भारतीयांचा सन्मान वाढवत आहेत, तर दुसरीकडे केवळ सत्तेसाठी विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. या सर्व नेत्यांनी कितीही वज्रमुठ घट्ट करण्याचा प्रयत्न केला तरी २०२४ च्या निवडणुकीत मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाच्या ४०० वर जागा निवडून येतील, असे बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा – अकोला : पत्नीने शेतीवर कामासाठी जाण्यास दिला नकार, पतीने संतापून…
उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल, संजय राऊत यांना महाराष्ट्र सांभाळता आला नाही तर हे देश कसा सांभाळणार? असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादीमध्ये पक्षांतर्गत पदासाठी वर्चस्वाची लढाई सुरू आहे. काँग्रेससुद्धा आता डुबते जहाज झाले आहे. राज्यातील नेतृत्वाला पक्षातील नेते व कार्यकर्ते जुमानत नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली.