लोकसत्ता टीम
नागपूर : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात बीसीसीआयने रणजी स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली. यामध्ये मागील सत्रातील उपविजेता विदर्भ संघाला ‘ब’ समूहात ठेवण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्यात रणजी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. विदर्भ संघाला यंदा आंध्रप्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, पुडुच्चेरी, हिमाचल प्रदेश आणि हैदराबाद यांच्या ब समूहात ठेवण्यात आले आहे. उपविजेता विदर्भ संघाला यंदाच्या सत्रात या संघांशी सामना करावा लागणार आहे.
बीसीसीआयने जाहीर केलेल्या सामन्यांच्या वेळापत्रकानुसार दुलीप चषकाने यंदाच्या सत्राची सुरूवात होणार आहे. ५ सप्टेंबरपासून अनंतपूर येथे ही स्पर्धा पार पडेल. यात चार संघ सहभागी होतील. यानंतर लगेच इराणी चषक आणि रणजी स्पर्धेचे सामने पार पडतील. रणजी स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पर्धा दोन टप्प्यात पार पडेल. पहिल्या टप्प्यात ‘ग्रुप स्टेज’चे सामने तर दुसऱ्या टप्प्यात नॉक आउट सामने होतील. दोन टप्प्यांच्या दरम्यान सय्यद मुश्ताक अली चषक आणि विजय हजारे चषक होणार आहे. सय्यद मुश्ताक अली चषकासाठी विदर्भ संघाला ड समूहात ठेवले गेले आहे. यामध्ये विदर्भासह आसाम, रेलवे,ओडिशा, छत्तीसगढ आणि पुडुच्चेरी या संघांचा समावेश आहे.
आणखी वाचा-‘नीट’च्या निकालाच्या गोंधळानंतर आता ‘जेईई’ची शिकवणी घेणाऱ्यांविरोधात शेकडो पालक रस्त्यावर
दुसरीकडे, विजय हजारे चषकासाठी देखील विदर्भ संघ ड समूहात राहणार आहे. यामध्ये विदर्भाचा सामना उत्तरप्रदेश, छत्तीसगढ, चंदीगढ, जम्मू – काश्मिर आणि मिझोरम या संघांशी होणार आहे. यंदाच्या सी.के. नायडू करंडक स्पर्धेत विदर्भाला रेल्वे, पंजाब, राजस्थान, आंध्रप्रदेश,हिमाचल प्रदेश, बंगाल आणि मेघालय या संघाविरूध्द खेळावे लागणार आहे. सीके नायडू स्पर्धेत नवी पॉईंट प्रणालीचा वापर होणार असल्याने यंदा ही स्पर्धा रंजक होणार असल्याचे सांगितले जात आहे.
आणखी वाचा-मोदींच्या शपथविधीनंतर उद्या होणाऱ्या सरसंघचालक डॉ. भागवत यांच्या भाषणाकडे लक्ष
नाणेफेक होणार नाही
यंदाच्या सीके नायडू स्पर्धेत नवा प्रयोग केला जाणार आहे. सामन्यात सर्वाधिक महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या नाणेफेकला वगळण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. नाणेफेक करण्याऐवजी पाहुण्या संघाला गोलंदाजी किंवा फलंदाजीबाबत निर्णय घेण्याची मुभा दिली जाईल. नाणेफेक न करण्याचा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे. स्पर्धेतील या प्रयोगाचे काय परिणाम होतात यावर या प्रयोगाचे भवितव्य टिकून आहे. बीसीसीआयने हा निर्णय चार सदस्यीय समूहाच्या शिफारसीनंतर घेतला आहे. चार सदस्यीय गटात भारताच्या पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण, पुरुष संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि भारताचे माजी वेगवान गोलंदाज आबे कुरुविला, बीसीसीआयचे सरव्यवस्थापक देशांतर्गत क्रिकेट यांचा समावेश होता