यवतमाळ : समाजमाध्यमे चांगली की वाईट? अशी चर्चा कायम सुरू असते. या माध्यमांची चांगली आणि वाईट, अशा दोन्ही बाजू आहेत. मात्र, आपण ही माध्यमे धार्मिक तेढ निर्माण करणे, जातीय सलोखा बिघडविणे, आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणे यासाठी वापरत असाल तर खबरदार! यवतमाळ जिल्ह्यात २०२३ या वर्षात जातीय गुन्ह्यांमध्ये सहभागी झालेल्या सुमारे ५० जणांना कारागृहाची हवा खावी लागली आहे, तर समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी सहाजणांना तुरुंगात जावे लागले. यात चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
ही चिंताजनक माहिती खुद्द पोलीस विभागानेच दिली आहे. समाजमाध्यमे अतिसंवेदनशील झाली आहेत. त्यामुळे फेसबुक, व्हॉट्सअॅप अथवा इंस्ट्राग्रामसारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत तसेच सामाजिक सलोखा बिघडून समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक झाले आहे. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट तसेच देवीदेवता आणि महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधान करणे, मॉर्फ केलेले छायाचित्र व्हायरल करणे, आदी कृत्य केल्यास अतिशय गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले जात आहेत.
छायाचित्रे आदींची विटंबना करून सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश टाकून धार्मिक तेढ निर्माण केली जाते. त्यामुळे अशा गुन्ह्यांबाबत पोलीस दल अधिकच सजग आहे. अशा गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलीस विभागाकडूनही ही प्रकरणे सक्षमतेने हाताळली जात आहेत. असा गुन्हा करणाऱ्या आरोपींना तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. त्यामुळे कुठल्याही भूलथापा तसेच प्रलोभनांना बळी न पडता धार्मिक चिथावणींच्या आहारी जाऊन समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाने केले आहे. अशा आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा – नागपूर: लकडगंजमध्ये १८ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त; ‘लोकसत्ता’च्या बातमीची दखल
पोस्ट क्षणभंगुर, पण अडचणी अनंत…
समाजमाध्यमांवर पोस्ट करण्यास एक क्षण पुरेसा आहे. मात्र या पोस्टमुळे तक्रार झाल्यास भविष्यात अनंत अडचणींचा सामाना करावा लागू शकतो. त्यामुळे आपली मुले समाजमाध्यमांचा कशा पद्धतीने वापर करत आहेत, याची अधूनमधून तपासणी पालकांनी करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अशा पद्धतीच्या पोस्ट व्हायरल करणे हा गुन्हा असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर शासकीय, निमशासकीय नोकरीकरिता तसेच इतर कुठल्याही कारणास्तव चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र काढायचे असेल तर संबंधितास अडचणी येतात. तसेच पासपोर्ट मिळणेही कठीण होते. त्यामुळे समाजमाध्यमांचा वापर जबाबदारीने करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.