अमरावती : रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ४९ लाख ६५ हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आल्याची घटना गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी १४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील तक्रारकर्ती महिला नवसारी मार्गावरील प्रिया पार्क येथे राहते. त्यांचा मोठा मुलगा सचिन याला रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. काही लाख रुपये भरल्यास थेट नियुक्तीपत्र देण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यानुसार सचिनने मोठी रक्कम आरोपींना दिली. त्यानंतर सचिनला रेल्वेमध्ये नोकरीचे खोटे दस्तऐवज देण्यात आले.
हेही वाचा >>> बुलढाणा: धक्कादायक! हळद लागताच अल्पवयीन मुलीने प्रियकरासह ‘फिनाईल’ प्राशन केले अन्…
इंग्रजीत अटी व शर्ती असलेल्या खोट्या दस्तऐवजावर बनावट शासकीय मुद्रा व स्वाक्षरी होती. नियुक्तीपत्र दिल्यानंतर मुंबईच्या डीएमआर कार्यालयासह खारघर रेल्वे स्थानकावर त्याला प्रशिक्षणदेखील देण्यात आले. तर दिल्लीतील सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल येथे त्याची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. मात्र, त्यानंतरही नोकरी न मिळाल्याने सचिन व त्याच्या आईने आरोपींना मोबाइलवर कॉल केले. त्यावर आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या प्रकरणात आरोपींनी रेल्वे व मिल्ट्री इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये नोकरी देण्याची बतावणी करून सचिनची आई व त्याच्या मावसभावाकडून तब्बल ४९ लाख ६५ हजार रुपये उकळले.
हेही वाचा >>> समृद्धी महामार्गावर इराळा येथे भरधाव कंटेनरचा अपघात
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सचिनच्या आईने गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी संदीप रमेश बाजड (४५) रा. देशमुख लॉन परिसर व एक महिला, प्रशांत धर्माळे (४०) रा. टॉवर लाइन, चेतन राऊत (४५), विजय माथूर, अनिकेत मिश्रा रा. दिल्ली, डॉ. श्रीकांत बानुबाकोडे (३५) रा. भातकुली यांच्यासह अन्य सात अशा एकूण १४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.