उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

नागपूर : करोना विषाणूच्या गुणधर्मात बदल झाला असून नवीन प्रकारच्या करोनाची साथ पुन्हा येत असल्याचे निदर्शनास येत आहे. काही देशांमध्ये त्याचा प्रभाव दिसून येत असल्याने राज्य सरकारनेही त्याकरिता सज्ज राहावे, असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी दिले.

चंद्रपूर जिल्ह्य़ात करोनासंदर्भातील सुविधांचा अभाव असल्याचा दावा करणारी याचिका माजी खासदार नरेश पुगलिया यांनी दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांनुसार, दिवसेंदिवस शहरात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्या तुलनेत कोविड रुग्णालयात खाटा उपलब्ध नाहीत.  रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नाही. करोनाची चाचणी करायला पुरेशी सुविधा नाही.

न्यायालयाला महापालिका आयुक्तांचे प्रतिज्ञापत्र हवे असताना उपायुक्तांनी अधिकार नसताना प्रतिज्ञापत्र दाखल केल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. त्यामुळे जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना पुढील सुनावणीवेळी व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे १६ डिसेंबरला आदेश दिले होते. त्यानंतर आज सोमवारी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त न्यायालयात हजर होते. त्यावेळी या याचिकांना प्रशासनाने नकारात्मकपणे स्वीकारू नये.

समाजाच्या हितासाठी अशा याचिका दाखल होणे गरजेचे असून आता नवीन स्वरुपाच्या करोनाची ओळख झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या साथीसाठी पुन्हा प्रशासनाने सज्ज राहावे, असे आदेश न्यायालयाने दिले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.