नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील रामदेगी बफर क्षेत्रातील हनुमानाच्या मंदिराला वाघाने प्रदक्षिणा घालताना अनेकांनी पाहिले आहे. कधी मंदिराच्या पायऱ्या चढताना, तर कधी मंदिराला प्रदक्षिणा घालताना कित्येक वन्यजीव छायाचित्रकारांनी हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले आहे. समाज माध्यमावरदेखील हे दृश्य खूप व्हायरल झाले आहे. मात्र, आता याच ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात एक अस्वल चक्क हनुमानाच्या मंदिरात लावलेली घंटी वाजवताना दिसून आला आहे. निखिल चुनारकर यांच्या कॅमेरा बायनाक्युलर रेंटल ताडोबा यांनी हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या देव्हाडा बफर क्षेत्रात हनुमानाचे एक मंदिर आहे. हनुमानाची एक छोटीशी मूर्ती आणि त्याच्याच समोर एक छोटी घंटी लावलेली आहे. कदाचित माणसे याठिकाणी फारशी येत नसावीत. मात्र, अस्वलाला हनुमानसमोर नतमस्तक होण्याचा मोह आवरला नाही. जंगलातून भटकत आलेले अस्वल हनुमानाच्या त्या छोट्याशा मंदिरात शिरले. त्याला नीट आतही जाता येत नव्हते, पण तरीही त्या अस्वलाच्या आत शिरण्याचा प्रयत्न केला आणि हाच प्रयत्न करत असताना मंदिरातील घंटी त्याच्या डोक्याला लागली.

मग काय ! त्या आवाजाचा मोह अस्वलाला आवरला नाही आणि एकदा नाही तर दोनदा, तीनदा त्याने चक्क घंटी वाजवली. निघताना पुन्हा हनुमानाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होऊन घंटी आणि घंटी वाजवून ते अस्वल तिथून बाहेर पडले. पर्यटकांसाठी ही बाब आश्चर्यकारकच होती, पण स्थानिक तसेच खात्यातील कर्मचाऱ्यांच्या मते बरेचदा अस्वल शेंदुराच्या वासाने आकर्षित होतात आणि मग ते खाण्यासाठी ते येतात. मात्र, याठिकाणी अस्वलाने ते शेंदूर खाल्ले नाही तर चक्कहनुमानसमोर ते नतमस्तक झाले.

काही महिन्यांपूर्वी याच ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाघ घास घेऊ पाहणाऱ्या आपल्या लाडक्या पिल्लाला वाचवण्यासाठी मादी अस्वल थेट वाघाशी भिडले. बराचवेळ चाललेल्या या लढाईत अखेर त्या मादी अस्वलातील मातृत्त्व जिंकले आणि वाघाला माघार घ्यावी लागली. वाघाच्या तावडीत सापडलेले सावज त्याने सोडल्याच्या घटना तशा फारच दुर्मिळ.

एकदा सावज टप्प्यात आले तर वाघ माघार घेत नाही. मात्र, ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात वाघाला माघार घ्यावी लागली. त्याने अस्वलाच्या पिल्लाची शिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी त्या पिल्लाची आई समोर आली आणि तिने पिल्लासाठी वाघाशी थेट लढाई सुरू केली. हा संघर्ष बराचवेळ चालला. मादी अस्वलाने अतिशय धैर्याने वाघाचा सामना केला.