अस्वलांसाठी प्रसिद्ध असलेल्या मेळघाट परिसरातील चिखलदरा प्रादेशिक विभागात अस्वल झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली. या परिसरात फिरणाऱ्या पर्यटकांच्या निदर्शनास हे आल्यानंतर त्यांनी वन्यजीवप्रेमीला ही माहिती दिली. मात्र, हे अस्वल नसून कुत्रा असल्याचा दावा स्थानिक वनाधिकाऱ्यांनी केला आहे, तर पर्यटक आणि वन्यजीवप्रेमी मात्र ते अस्वलच असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे वन्यप्राणी ओळखण्यात वनाधिकारी खरे की पर्यटक व वन्यजीवप्रेमी खरे, असा पेच निर्माण झाला आहे.
चिखलदरा परिसरात सध्या पर्यटकांची धूम आहे. चिखलदऱ्यातील पंचबोल या प्रसिद्ध ठिकाणापासून काही अंतरावर पर्यटकांना अस्वल झाडाला बांधलेल्या अवस्थेत दिसले. त्यामुळे त्यांनी तातडीने त्याचे छायाचित्र घेऊन स्थानिक वन्यजीवप्रेमींना पाठवून या घटनेची माहिती दिली. दोन दिवसांपासून घडलेल्या या घटनेबाबत वनखात्याला काहीही माहिती नव्हते. या परिसरात अस्वले मोठय़ा संख्येने आहेत. अस्वलांची शिकारही मोठय़ा प्रमाणावर केली जाते. त्यामुळे एकतर गावकऱ्यांनी त्या अस्वलाला मारले असावे किंवा वाघांसाठी लावलेल्या शिकारीच्या जाळ्यात अस्वल अडकले असावे, अशी शंका स्थानिक वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केली. दोन दिवसांपासून झालेला हा प्रकार वनखात्याच्या मात्र कसा काय लक्षात आला नाही, याचे आश्चर्यही व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, वन्यजीवप्रेमींनी ही माहिती मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, विभागीय वनाधिकारी एस.युवराज यांना माहिती दिली. त्यानंतरही वनाधिकाऱ्यांना त्याचे फारसे गांभीर्य दिसून आले नाही. त्यांनी रविवारी सकाळी कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. ते अस्वल नव्हे, तर कुत्रा असल्याचे वनाधिकारी सांगत असल्याने पर्यटक आणि वन्यजीवप्रेमी खोटे की वनखात्याचे कर्मचारी, असा प्रश्न येथे निर्माण झाला आहे.

या संदर्भात एस.युवराज यांना विचारले असता त्यांनी हे अस्वल नाही, तर कुत्रा असल्याचे सांगितले. पशुवैद्यकीय अधिकारीसुद्धा आमच्या कर्मचाऱ्यांसोबत गेले होते. त्यांनीही तपासणी केल्यानंतर आम्ही त्यावर शिक्कामोर्तब केले. गावकऱ्यांनी रेबिज झालेल्या कुत्र्याला मारून झाडाला अडकवले असल्याचे त्यांनी सांगितले.