वर्धा महावितरणच्या कार्यालयात जावून तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत मारहाण केल्याप्रकरणी हिंगणघाट नगरपालिकेचे तत्कालीन अध्यक्ष श्यामकुमार मसराम यांना हिंगणघाट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश विद्याधर काकतकर यांनी कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवत शिक्षा सुनावली. या निकालानुसार माजी नगराध्यक्ष श्यामकुमार मसराम यांना कनिष्ठ न्यायालयाने दिलेली तीन वर्षे कारावास तसेच दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्याचा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा >>>खळबळजनक! मठातील दोन जेष्ठ नागरिकांची निर्घृणपणे हत्या

मे २००९ मध्ये श्यामकुमार मसराम हे नगरपालिकेचे अध्यक्ष असताना रात्री नऊ वाजताचे दरम्यान महावितरणच्या अभियंता कार्यालयात आपल्या सहकाऱ्यासह पोचले. फिर्यादी शशीचंद्र राठोड तसेच अभियंता विवेक कोठारे हे आपले कार्यालयीन कामकाजात व्यस्त असताना मसराम यांनी शहरातील स्ट्रीटलाईटचे काम का केले नाही, असा जाब विचारत त्यांच्याशी वाद घातला. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला परंतु या दरम्यान संतप्त होऊन त्यांनी सरकारी कागदपत्रे फेकली व त्यांच्या अंगावर खुर्च्यासुद्धा फेकून मारल्याचा आरोप होता.

हेही वाचा >>>नागपूर: कॅन्सर रुग्णालयाचा चेंडू आता ‘एनएमआरडीए’च्या ‘कोर्टात’

महावितरणतर्फे पोलीस तक्रार करण्यात आली. सदर प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कनिष्ठ न्यायालयाने श्यामकुमार मसराम यांना दोषी आढळल्याने शिक्षा सुनावली होती. ‌यानंतर श्याम कुमार मसराम यांनी या निकालाविरोधात अतिरिक्त सत्र न्यायाधीश विद्याधर काकतकर यांच्या न्यायालयात अपील दाखल केले. या प्रकरणात हिंगणघाट येथील सत्र न्यायालयानेही कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. हिंगणघाट येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या उपरोक्त प्रकरणी सरकारी पक्षातर्फे अतिरीक्त सरकारी अभियोक्ता तथा सहायक सरकारी वकील अड. दिपक वैद्य यांनी बाजू मांडली.

Story img Loader