बुलढाणा : लग्न संबंधाच्या चर्चेवरून वाद झाल्याने चौघांनी एकास लोखंडी रॉड व काठीने मारहाण केली. प्रकरणी एकाच कुटुंबातील चार जणांविरुद्ध बोराखेडी पोलिसानी गुन्हा दाखल केला असून जखमी इसमावर उपचार सुरु आहे.
मोताळा येथे ही घटना घडली असून फिर्यादी शेख हुसेन शेख सत्तार यांच्या फिर्यादीवरून सोमवारी रात्री पावणे दोन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी रात्री उशिरा शेख हुसेनचा मावसभाऊ व चार जणांमध्ये सोयरीकवरून चर्चा सुरू होती. चर्चेचे पर्यवसान वाद व नंतर मारहाणीत झाले. चौघांनी एकाला लोखंडी रॉड, काठीने मारहाण केली. बोराखेडी पोलिसांनी आरोपी शेख कासम शेख इब्राहिम, शेख आजम इब्राहिम, शेख अक्रम इब्राहिम व सईदाबी शेख इब्राहिम यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले. ठाणेदार बळीराम गीते यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक आडोकार तपास करीत आहे.