नागपूर: बीड जिल्ह्यातील सरपंचाची हत्या प्रकरण विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत गाजत असून सरकारने त्यावर दिलेल्या आश्वासनावर विरोधकांचे समाधान होत नसल्याचे दिसून येत आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत हे प्रकरण गाजले, सभागृहात मुख्यमंत्री उपस्थित असताना त्यांनी यावर भाष्य केले नाही. त्याचा निषेध करीत विरोधी पक्षांनी सभात्याग केला.

जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी असलेल्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांनी केली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपींना पोलिसांनी अटक केली नाही तर जिल्ह्यात असंतोष उफाळून येईल याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले व सरकारच्यावतीने यावर निवेदन करावे अशी विनंती केली. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केले नाही. अध्यक्षांनी दुसऱ्या सदस्याचे नाव पुकारले. यावर आक्षेप घेताना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी सरकार गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप केला व विरोधी पक्षाने सभात्याग केला.

हेही वाचा – “उद्धव ठाकरेंनी आमदारांना प्रशिक्षण द्यावे, परंतु आत्मचिंतन…”, उदय सामंत यांचा टोला

हेही वाचा – Nana Patole : नाना पटोलेंकडून अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी, म्हणाले…

यानंतर भाजपच्या नमिता मुंधडा यांनी वरील मुद्दा मांडला व अद्याप प्रमुख आरोपींना अटक झाली नाही याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. याच हत्येचे पडसाद सोमवारी देखील नागपूर येथील अधिवेशनात तसेच नवी दिल्लीत संसदेतही उमटले होते. संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपीची राजकीय नेत्यांशी जवळीक असल्याने आजही तो मोकाट फिरत आहे, असा खळबळजनक आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अधिवेशनात केला होता.

Story img Loader