लोकसत्ता टीम

वर्धा : गोमातेस कामधेनू म्हणून संबोधल्या जाते. तसेच एक पूजनीय व पवित्र असे स्थान हिंदू धर्मात गाईला देण्यात आले आहे. तसेच हा गोवंश वाढावा म्हणून प्रयत्न सातत्याने सूरू असतात. मात्र याच गाईची कत्तल करीत ते अन्न म्हणून प्रसिद्ध हॉटेलात विकल्या जात असल्याची बाब उजेडात आली आहे. या घटनेने सदर हॉटेलात यापूर्वी जेवण करणाऱ्या अनेकांना धक्का बसला आहे.

स्थानिक इतवारा चौकातील हे हॉटेल आहे. या अल बरकत बिर्याणी सेंटर नामक हॉटेलची बिर्याणी मोठ्या प्रमाणात विकल्या जात असते. याच हॉटेलात शहर पोलिसांनी धाड टाकत तपासणी केली. तेव्हा बिर्याणीत गोमांस आढळून आले. गोपनीय माहितीआधारे टाकलेल्या धाडीत खरोखर गोमांस सापडल्याने पोलीसांनी हॉटेल मालक कमर अली अमजद अली सय्यद रा. बोरगाव मेघे तसेच फरीद कुरेशी रा. कुरेशी मोहल्ला यांना अटक केली आहे. हे गोमांस फरीद याने पुरविल्याचे स्पष्ट झाले आहे. या धाडीत पोलिसांनी पाच किलो गोमांस बिर्याणी जप्त केली आहे. यासोबतच अन्य काही हॉटेलची तपासणी झाली.

शासनाने गोवंश कत्तल व गोमांस विक्री करणे हा गुन्हा ठरविला आहे. या मांस विक्रीस मनाई आहे. मात्र तरीही गोवंश विक्री होताच आहे. कत्तलखान्याकडे गुरेढोरे घेऊन जाणारे ट्रक अनेकदा पकडण्यात येतात. हे मास स्वस्त दराच्या हॉटेलमध्ये प्रामुख्याने विकल्या जाते. महिन्याभरपूर्वी पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी काही अश्या कत्तलखाण्यावर कारवाई केली होती. तरीही विक्री होत असल्याचे दिसून आले. स्थानिक इतवारा बाजार व महादेवपुरा परिसरात अलीकडच्या काळात अनेक बिर्याणी सेंटर उघडली आहेत.

ठाणेदार पराग पोटे म्हणाले की अश्या हॉटेलतून गोमांस विकल्या जात असल्याचे कळले. म्हणून ही कारवाई झाली असून पुढेही लक्ष ठेवल्या जाणार. ही बाब उजेडात आल्याने मांसाहारी खवय्यांची झोप उडाली आहे. काही वर्षांपासून शहराच्या विविध भागात बिर्याणी विक्रीची अनेक दुकाने थाटल्या गेली. त्यात विविध प्रकारच्या बिर्याणी स्वस्त दरात मिळत असल्याने लोकांच्या उड्या पडतात. तेव्हा प्रतिष्ठित हॉटेलवाले म्हणत ४० रुपये प्लेट मध्ये काय मिळणार, याचा ग्राहकांनीच विचार केला पाहिजे. आज अखेर बिंग फुटलेच. आता अवैध गोवंश व मांस विक्रीवर अधिक कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Story img Loader