लोकसत्ता टीम
नागपूर: एकीकडे मातृत्व दिन, रक्षाबंधन, भाऊबीज, महिला दिन साजरा केला जातो, मातृ वंदन, एक पेड मां के नाम, लाडकी बहिण योजना राबविली जाते, ‘भारत माता कि जय’ अशा घोषणा दिल्या जातात. तर दुसरीकडे आई आणि बहिणींशी निगडीत स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या अपशब्दांचा व अश्र्लाघ्य शिव्यांचा वापर भांडणाच्या वेळी तर सोडा इतर वेळी सुद्धा आजकाल सर्व समाजातील व्यक्तींकडून सर्रासपणे केला जातो.
भारतीय संविधानाने माता-भगिनी व एकूणच स्त्रीत्वाच्या सन्मानासाठी, आपल्या समृद्ध संस्कृतीच्या संरक्षणासाठी आणि सभ्य, सुसंस्कृत व अभिरूची संपन्न समाज निर्मितीसाठी काही कर्तव्य सांगितली आहेत. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्र असोशिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्सचे (मास्वे) संस्थापक अध्यक्ष व प्रा. अंबादास मोहिते यांनी राज्यात ‘शिव्यामुक्त समाज अभियान’ सुरू केले आहे. यात राजकीय पक्षांना काही सूचना आणि प्रतिज्ञापत्राचा नमूना देण्यात आला आहे.
आणखी वाचा- रवी राणांच्या नव्या दाव्यामुळे भाजपचा एक गट पुन्हा अस्वस्थ
ओटीटी प्लटफॉर्मवर पायबंद घाला
सध्या ओटीटी प्लटफॉर्मवर दाखविण्यात येणाऱ्या वेब सिरीज व चित्रपटांमध्ये आया-बहिणींवरील अश्लील शिव्यांचा, अत्यंत अश्लील व हिंसक दृश्यांचा सर्रासपणे वापर केला जातो. हे निश्चितच आपल्या सामाजिक मूल्यांशी अजिबात सुसंगत नाही व समाजाकरिता भूषणावह सुद्धा नाही. त्यामुळे याला सुद्धा पायबंद घालणे आवश्यक आहे अशीही मागणी करण्यात आली आहे. राज्यात सर्व सार्वजनिक ठिकाणी तसेच ओटीटी प्लटफॉर्मवर स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या, स्त्रि-पुरुषांच्या जननेंद्रिये आणि इतर अश्लील शब्दांचा उल्लेख असणाऱ्या अश्र्लाघ्य शिव्यांच्या वापरावर बंदीघालण्यात येईल अशी घोषणा आपल्या पक्षाच्या विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात करावी अशी मागणीही करण्यात आली.
आणखी वाचा-हलबा समाजाला डावलणाऱ्यांविरोधात मतदान, ‘या’ फलकाने वाढवले सर्व पक्षांचे टेन्शन…
राजकीय नेत्यांकडून असे प्रतिज्ञापत्र घ्या?
लोकप्रतिनिधी व राजकीय नेते हे मत प्रणेता, लोकमत घडविणारे असतात. त्यांच्या उक्तीचा व कृतीचा जनमानसावर प्रभाव पडत असतो. त्यांनी जर सर्वांना महिलांचा सन्मान करण्याचे आवाहन केले आणि स्वतः कृतीतून तसे दाखवून दिले, तर त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम जनतेवर होईल व लिंगभाव समानता आणि सभ्य समाज निर्मितीकरिता ही बाब सहाय्यभूत ठरेल. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील आपल्या पक्षाच्या सर्व उमेदवारांनी, “मी प्रचारात, सार्वजनिक ठिकाणी घरी व अन्यत्र माता- भगिनींचा व एकूणच स्त्रीत्वाचा अनादर करणारे अपशब्द व शिव्या वापरणार नाही असे ‘प्रतिज्ञा पत्र’ जनतेला सादर करावे व त्या प्रतिज्ञा पत्राचे फलक मतदार संघात लावावे आणि प्रचार पत्रकात त्याचा समावेश करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.