वर्धा : उमेदवाराचा विजय होण्यामागे अनेक कारणे असतात. पक्ष, पैसा, पदाधिकारी, पक्षनेते, पोहोच अशी विविध कारणे सांगितल्या जातात. मात्र, पडद्यामागे पण काही सूत्रधार मनापासून झटत असतात. विजयात त्यांचाच वाटा मोठा असतो कारण त्यांच्यावर विश्वासाने जबाबदारी टाकली जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आघाडीचे अमर काळे यांच्या विजयामागे अशी काही मंडळी कार्यरत होती. त्यांची पण कामगिरी चर्चेत आहे.

१ ) अविनाश काकडे – उमेदवार ठरण्या पूर्वीच भाजपविरोधी व्यक्ती व संघटनाची मोट बांधण्याचे काम भारत जोडो अभियानाने केले. त्याचे संयोजक म्हणून अविनाश काकडे हा गांधीवादी परिवारातील चेहरा होता. त्यांनी केवळ काँग्रेस विचारीच नव्हे तर मोदी विरोधक म्हणून जाहीर परिचित लोकांना तसेच समविचारी पक्षांना एकत्र आणले. माकपचे यशवंत झाडे हे कधी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करतील, यावर कोणी विश्वास ठेवला नास्ता. पण ते व अन्य असे एकत्र करीत भक्कम व्यासपीठ तयार करीत राज्यातील आघाडीच्या नेत्यांना चांगला उमेदवार द्या असे साकडेच काकडे यांनी लेखी पत्र लिहून घातले होते. काळे आले आणि ही चमू कामास लागली. बूथ पर्यंत नियोजन, प्रचार आखणी, समन्वय साधने आणि आर्थिक व्यवहारापासून दूर राहून विजयाची गणिते साधण्याचे काम या चमुने केले.

२) मयुरा काळे – अमर काळे यांच्या अर्धांगिनी असलेल्या मयुरा काळे या त्यांच्या माहेरच्या राजकीय प्रभावाने चर्चेत होत्याच. पण पुढे तिकीट पक्की झाल्यावर त्यांनी आर्वी मतदारसंघाची जबाबदारी एकहाती घेतल्याचे सांगितल्या जाते. स्वतःचे महिला बचत गटाचे जाळे उपयोगात आणून आर्वी परिसर पिंजून काढणे, नाराज मंडळींची नाराजी दूर करणे व सोबतच घरी तक्रारी घेऊन येणाऱ्यांचे तक्रारी निरसन करण्याची जबाबदारी मयुरा काळे यांनी पार पडली.

हेही वाचा…गोंडवाना विद्यापीठात तब्बल १.४६ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार, चार लिपिकांचा सहभाग

३) विजय घवघवे – काळे पंचायत समिती सदस्य होते तेव्हापासून सावलीसारखे राहणारे विजय घवघवे हे या लोकसभा निवडणुकीत मुख्य सूत्रधार राहले. एखाद्या विधानसभा क्षेत्रात उणीव असल्यास ती दूर करणे, प्रचार साहित्य व्यवस्था, सभा नियोजन अशी जबाबदारी. अधिकार पण द्या, असे स्पष्ट करीत त्यांनी कामे मार्गी लावली.

४) नावेद शेख – पूर्णपणे अराजकीय चेहरा असलेले नावेद शेख हे शिक्षण क्षेत्रात काम करतात. पण संविधान संरक्षण महत्वाचे म्हणत ते एक वर्षांपासून आघाडीत जुळले. तसेच सामाजिक चेहरा असलेले अमीर अली अजाणी यांनी अल्पसंख्यांक समुदायात काळे यांचे काम केले. त्यांची भरीव मदत झाल्याचे अविनाश काकडे सांगतात.

हेही वाचा…वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांचा पराभव भाजपसाठी चिंतेचा विषय

५ ) डॉ. शिरीष गोडे – लोकसभेसाठी उभे रहा, असा लकडा काळे यांच्यामागे लावण्यात डॉ. गोडे पुढे होते. उमेदवारी आल्यानंतर प्रचार कार्यालय तसेच वार रूम त्यांच्याच बंगल्यात साकारली. पैसे येण्याची वाट न बघता पदरचे टाकून त्यांनी कामे मार्गी लावली. त्यांच्या घरून दुसऱ्यांदा खासदारकीचा पाळणा हलला. त्याचे वडील संतोषराव गोडे हे खासदार होते.

हेही वाचा…नितीन गडकरींना फडणवीसांच्या मतदारसंघाहून अधिक मताधिक्य खोपडेंच्या मतदारसंघात

६) संकल्प श्रीवास्तव – खास मुंबईतून दहा युवकांची चमू काळे प्रचारातील कच्चे दुवे शोधण्यासाठी प्रदेश नेत्यांनी पाठविली होती. त्याचे नेतृत्व संकल्प श्रीवास्तव यांनी करतांना स्थानिक बाबी वरीष्ठान्ना कळविणे तसेच पूरक बाबींची मदत मागविण्याचे कार्य साधले. मुंबई वर्धा यातील दुवा म्हणून काम करतांनाच त्यांनी पत्रकारांशी संवाद, कच्चे दुवे हेरणे, प्रचार कार्यास योग्य तोंडवळा देण्याची जबाबदारी सांभाळली, असे म्हटल्या जाते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Behind the scenes the unsung heroes who contributed to amar kale s victory in wardha pmd 64 psg