अमरावती : येथील बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण झाले असून ३१ मार्च २०२४ पासून प्रवासी विमानसेवा सुरू करण्याचे सरकारचे नियोजन आहे, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केल्यानंतर अमरावतीत आनंद व्यक्त केला जात आहे.अमरावती विमानतळावर नुकतीच ‘एअर कॅलिबरेशन ऑफ प्रिसिजन अप्रोच पाथ इंडिकेटर’ अर्थात ‘पीएपीआय’ चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. त्यामुळे अमरावतीकरांना मुंबईपर्यंत विमानाने ये-जा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमरावती विमानतळावरून विमान उड्डाण करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) परवानगी मागण्यात आली आहे.

ही परवानगी आल्यानंतर इथून नियमित विमान उड्डाण सुरू होईल. दरम्यान, अमरावती विमानतळ सुरू झाल्यानंतर त्याअनुषंगाने या भागात उद्योगधंदे, रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. येत्या ३१ मार्चपासून प्रवासी विमानसेवा सुरू होण्याचे संकेत अर्थमंत्र्यांनी दिल्याने आता अमरावतीकरांचे विमानसेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अर्थमंत्र्यांच्या घोषणेचे स्वागत करण्यात येत आहे.
अमरावती विमानतळावर नवीन धावपट्टी तयार करण्यात आली आहे. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. १८ बाय ५० मीटरची ही धावपट्टी आहे. त्यामुळे येथून एटीआर हे ७२ आसनी विमान उडू शकणार आहे.

हवाई वाहतूक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बंगळुरूहून अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर उड्डाण केलेल्या बीच एअर ३६० ईआर टर्बोप्रॉप विमानावर भारतीय विमानतळ प्राधिकरण, फ्लाइट इन्स्पेक्शन युनिटने कॅलिब्रेशन केले. या विमानाने २६/०८ धावपट्टीवरून अमरावती विमानतळावरून उड्डाण केले आणि त्याचे कॅलिब्रेशन यशस्वीरित्या पूर्ण केले. पॅसेंजर टर्मिनल बिल्डिंग, एटीसी टॉवर्स आणि इतर नागरी कामे पूर्ण झाली असून, अमरावतीहून लवकरच पूर्ण व्यावसायिक उड्डाणे सुरू होण्यापूर्वी गेल्या काही सुरक्षाविषयक तपासण्या केल्या जात आहेत. प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत मुंबई-अमरावती-मुंबई मार्गावर अलायन्स एअर या कंपनीच्या माध्यमातून एटीआर ७२ आसनी विमान सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे.

या विमानतळावर ‘पीएपीआय’ प्रणाली बसवण्यात आली आहे. विमान वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी ते एक आवश्यक साधन मानले जाते. धावपट्टीजवळ येणारी विमाने जवळ येताना आणि सुरक्षित लँडिंगसाठी योग्य ग्लाइड उतार राखण्यासाठी ते आवश्यक आहे. ‘पीएपीआय’ प्रणालीचे कॅलिब्रेशन विमानतळाच्या पायाभूत सुविधांचा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. ते आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरक्षा मानकांनुसार करण्यात आले आहे.

Story img Loader