अमरावती : बेलोरा येथील विमानतळ आता व्यावसायिक उड्डाणासाठी सज्ज झाले असून येत्या ३० मार्चला पहिली व्यावसायिक उड्डाण प्रमाणीकरण चाचणी होण्याची शक्यता आहे. येत्या ३० मार्चला इंदूर येथून एटीआर ७२ हे विमान अमरावती विमानतळावर पोहचणार असून त्याच दिवशी पहिली व्यावसायिक चाचणी पार पडण्याची शक्यता आहे. दोन ते तीन तांत्रिक तपासण्यानंतर अमरावती-मुंबई विमानसेवा सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

काही दिवसांपूर्वी अमरावती विमानतळावर ‘एअर कॉलीबशन ऑफ प्रिसिजन अप्रोच पाथ इंडिकेट’ अर्थात ‘पीएपीआय’ चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली. या चाचणीद्वारे अमरावती विमानतळावरून मुंबईच्या दिशेने विमान प्रवासाचा मार्ग मोकळा झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ मार्चला अमरावती विमानतळ सुरू होणार, असे अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर केले होते.

गेल्या १३ मार्चला अमरावती विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) परवाना दिला. ‘रिजनल कनेक्टिव्हीटी स्कीम’ अंतर्गत अमरावती विमानतळ हे अधिकृत परवानाधारक विमानतळ म्हणून घोषित झाले. अलायन्स एअरची मुंबई-अमरावती-मुंबई ही विमानसेवा सुरुवातीला आठवड्यातून तीनदा सेवा देईल. अमरावती ते मुंबई विमानसेवा या महिन्याच्या अखेरीस सुरू होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे शूभसंकेत मिळाले होते.

अमरावती विमानतळावर नवीन धावपट्टी तयार करण्यात आली आहे. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. १८ बाय ५० मीटरची ही धावपट्टी आहे. त्यामुळे येथून एटीआर हे ७२ आसनी विमान उडू शकणार आहे. पॅसेंजर टर्मिनल बिल्डिंग, एटीसी टॉवर आणि इतर नागरी कामे पूर्ण झाली असून, अमरावतीहून लवकरच पूर्ण व्यावसायिक उड्डाणे सुरू होण्यापूर्वी अनेक सुरक्षाविषयक तपासण्या करण्यात आल्या आहेत. प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत मुंबई-अमरावती-मुंबई मार्गावर अलायन्स एअर या कंपनीच्या माध्यमातून एटीआर ७२ आसनी विमान सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. विमानतळ आता प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज झाले आहे. एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात व्यावसायिक विमानसेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अमरावतीकरांना विमानसेवेच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा आहे. ‘अलायन्स एअर’च्या संकेतस्थळावर विमातळांच्या यादीत अमरावती हे नाव झळकत असले, तरी वेळापत्रक मात्र अद्याप घोषित झालेले नाही. आठवड्यातून तीन दिवस मुंबई-अमरावती-मुंबई विमानसेवा सुरू होण्याचे संकेत आहेत. अमरावती विमानतळावरून पहिल्या व्यावसायिक विमान उड्डाणाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.