नागपूर : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. या नव्या सरकारमध्ये राज्याचा कारभार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आला आहे. निवडणुकीत महायुतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ २१०० रुपयांपर्यंत वाढवण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर हे पैसे नेमके कधी मिळणार? असे लाभार्थी महिलांकडून विचारला जात होते.
याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महिलांना २१०० रुपये मिळणार हे नक्की आहे. आम्ही जी आश्वासने दिली त्या पूर्ण करणार आहोत. ही आश्वासने पूर्ण करण्यासाठी ज्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतील, त्या आम्ही आधी करू. छाणनीबद्दल बोलायचे झाले तर निकषाच्या आत ज्या महिलांना लाभ मिळत असेल, त्यांना लाभ मिळेलच. पण काही महिलांना निकषाच्या बाहेर राहूनही लाभ मिळत आहे, अशा तक्रारी आलेल्या आहेत.
हेही वाचा >>> विरोधी पक्षनेते पदासाठी अर्ज करावा लागतो का? नाना पटाले अध्यक्षांना सवाल म्हणाले….
तुम्हाला कल्पना असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा शेतकरी सन्मान योजना चालू केली होती, तेव्हा पहिल्यांदा मोठ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळाला होता, असे समोर आले होते. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी स्वत: समोर येऊन आम्ही निकषात येत नाहीत, असे सांगितले होते. त्यानंतर ती योजना स्थिर झाली. अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजनेत काही महिला निकषाच्या बाहेर असतील तर त्याचा पुनर्विचार होईल. या योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याचा कोणताही विचार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविभवन येथे महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत विरोधकांनी लाडकी बहिण योजनेवरून अनेक आरोप केले आहेत.
हेही वाचा >>> भंडारा : मंत्रिपद न मिळाल्याने नाराज नरेंद्र भोंडेकरांचा पदाचा राजीनामा
लाडक्या बहिणींना सरकार २१०० रुपये कधी देणार? असा प्रश्न विरोधकांनी केला. तसेच अटी व शर्थी न लावता सरसकट पैसे द्यावे अशी मागणी नाना पटोले यांनी केली. तसेच सरकारने तात्काळ शेतकरी कर्जमाफीची घोषणा करावी अशीही मागणी केली.
आरोपीला राजकीय आश्रय देणारे आज मंत्री – वडेट्टीवार
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकाल नंतर राज्यात महायुतीचे सरकार आले. विदर्भाचे मुख्यमंत्री झाल्यावर नागपूरात पहिले अधिवेशन असताना,वैदर्भीय जनतेचा अपेक्षाभंग महायुती सरकारने केला आहे. अधिवेशन कालावधी कमी असल्याने विजय वडेट्टीवार यांनी ही टीका केली आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या होत आहे, सोयाबीन, धान कापसाला हमीभाव मिळत नाही. विदर्भात खूप मोठे प्रश्न आहेत, पण त्याला या सरकारने हरताळ फासला आहे. त्यामुळेच शेतकरी विरोधी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतल्याचे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. बीडमध्ये एका सरपंचाचे अपहरण करून त्याची निर्घृणरित्या हत्या करण्यात आली. यातील आरोपीला राजकीय वरदहस्त आहे. खून करणाऱ्या आरोपीला राजकीय आश्रय देणारे आज मंत्री केले जाते, त्यामुळे या खुनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे वडेट्टीवार म्हणाले.