यवतमाळ : शहरालगतच्या जंगलात पट्टेदार वाघ फिरतोय. ज्ञवन विभागाच्या कॅमेऱ्यात तो आढळला. त्यामुळे यवतमाळकरांची चिंता वाढली आहे. शहरालगत चारही बाजूंनी जंगल आहे. या ठिकाणी वाघाचे वास्तव्य असल्याच्या चर्चा नेहमीच होते. शनिवारी दुपारी घाटंजी मार्गावर असलेल्या बोधगव्हाण शिवारात पट्टेदार वाघाने एका गाईवर हल्ला केला. या भागात वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले. तसेच वन विभागाच्या कॅमेऱ्यातही हा वाघ कैद झाला. त्यामुळे यवतमाळ शहरालगतच्या जंगलात वाघाचे वास्तव्य असण्यावर शिक्कामोर्तब झाले.

प्रदीप पिंपळकर या शेतकऱ्याची गाय शिवारात चरत असताना पट्टेदार वाघाने तिच्यावर हल्ला केला. गाय संकटात असल्याने जोराने हंबरू लागली. शेतकरी धावत आल्यानंतर वाघ गायीवर हल्ला करत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे लोकही जमा झाले. सर्वांनी आरडाओरड केल्याने वाघ शिकार सोडून पळून गेल्याने गाय बचावली. या हल्ल्यात गाईच्या शरीरावर वाघाच्या पंजाचे ओरखडे पडले आहे. शिवारात वाघ असल्याची बातमी सर्वत्र पसरल्यानंतर बोधगव्हाण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा – नागपूर : हजारो सीसीटीव्ही कॅमेरे ठरले ‘पांढरा हत्ती’, पोलीस तपासात अडचणी

यवतमाळ शहराच्या एमआयडीसी परिसरात व अमरावती मार्गावरील चिचबर्डी जंगलात काही वर्षांपूर्वी पट्टेदार वाघाचे वास्तव्य होते. काही दिवसांच्या मुक्कामानंतर हा वाघ पुन्हा दिसला नाही. मात्र आता बोधगव्हाण शिवारात पुन्हा वाघ दिसल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. ज्या परिसरात वाघाचे पगमार्क आढळले, तेथे ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या भागातील नाल्यामध्ये वाघ पाण्यात बसलेल्या अवस्थेत ट्रॅप कॅमेऱ्याने टिपला आहे. वाघाच्या शोधासाठी वनविभागाकडून ड्रोनचाही वापर केला जात आहे. वाघाच्या हालचालीवर वन विभाग लक्ष ठेवून आहे. सुरक्षेच्या उपाययोजनाही केल्या आहेत. या वाघास त्याच्या मूळ अधिवासात परत पाठविण्यासाठी वन विभाग प्रयत्नशील आहे.

यवतमाळ शहरालगत सर्वत्र निसर्गरम्य परिसर व जंगल असल्याने दररोज सकाळी शेकडो नागरिक फिरायला जातात. येथील जाम मार्गावर नागरिकांची वर्दळ असते. याच परिसरात वाघाची भ्रमंती असल्याने सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. या परिसरात काही खासगी शाळा असल्याने पालकांनीही चिंता व्यक्त केली आहे.

हेही वाचा – “अब की बार महिला आमदार”; भंडारा जिल्ह्याला लागले महिला आमदाराचे डोहाळे

बिबट्याने पाडला दोन गायींचा फडशा

जंगलात चरण्यासाठी गेलेल्या दोन गायींचा बिबट्याने फडशा पाडला. ही घटना नेर तालुक्यातील सोनखास हेटी शिवारात घडली. सुखदेव घाटोळ यांच्या मालकीची जनावरे हेटी शिवारात चरण्यासाठी गेली होती. दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवून गायींना ठार केले.