गडचिरोली : अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे ६ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या जनसन्मान यात्रेत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी मुलगी आणि जावयाविषयी केलेल्या विधानावरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. येत्या १२ किंवा १३ सप्टेंबरला मंत्री आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम (हलगेकर) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता असल्याने राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच वडील विरुद्ध मुलगी असा राजकीय संघर्ष रंगणार आहे.
राज्यात येत्या काही महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना त्यांच्याच मोठ्या मुलीने आव्हान दिल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर या वादाची ठिणगी पडल्याचे बोलले जाते. आत्राम लोकसभेकरिता इच्छुक होते. परंतु ऐनवेळेवर त्यांना उमेदवारी मिळाली नाही. यामुळे त्यांनी विधानसभेवर लक्ष केंद्रित केले. मात्र, त्यांची मोठी मुलगी भाग्यश्री आत्राम, जावई ऋतुराज हलगेकर हेदेखील विधानसभेसाठी इच्छुक असल्याने घरातच सत्तासंघर्षाला सुरुवात झाली. त्यामुळे आजपर्यंत धर्मरावबाबा यांच्या नेतृत्वाखाली मोठे झालेले मुलगी आणि जावई आता त्यांनाच आव्हान देत आहेत.
हे ही वाचा… गोंदियाः पूर्व विदर्भात भाजप ला मोठा धक्का, माजी आमदार गोपालदास अग्रवाल कॉंग्रेसमध्ये परतणार
६ सप्टेंबरच्या जनसन्मान यात्रेतील भाषणादरम्यान मंत्री आत्राम यांनी मनातील खदखद जनतसमोर बोलून दाखविल्याने जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात याविषयी चर्चा सुरू झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष, बांधकाम सभापतीसह विविध राजकीय पद भूषवलेल्या भाग्यश्री आत्राम या मागील काही दिवसांपासून शरद पवार गटाच्या संपर्कात होत्या. अनिल देशमुख यांनीदेखील याविषयी वेळोवेळी भाष्य केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या १२ किंवा १३ सप्टेंबरला अहेरी येथे भाग्यश्री आत्राम आणि त्यांचे पती ऋतुराज हलगेकर आपल्या समर्थकांसह शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. या कार्यक्रमाला सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा…नागपूर: गणेशोत्वावर ‘स्वाईन फ्लू’चे सावट..
राजघराण्यात लढत
काका राजे विश्वेश्वरराव आत्राम यांच्यापासून वेगळे होत धर्मरावबाबा आत्राम यांनी आपले वेगळे राजकीय अस्तित्व निर्माण केले. गेली पन्नास वर्षे ते राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. चुलत बंधू सत्यवानराव आत्राम आणि त्यानंतर पुतणे अम्ब्रीशराव आत्राम यांच्याशी त्यांची थेट लढत होत असते. काही अपवाद सोडल्यास अहेरी विधानसभेत राजघराण्याचे वर्चस्व कायम राहिले आहे. मात्र यंदा पहिल्यांदाच राजघराण्यातील तिघे विधानसभेचा आखाड्यात एकमेकांविरुद्ध उभे राहणार आहे. त्यामुळे यावेळी अहेरी विधानसभेतील राजकीय घडमोडीवर अनेकांनी लक्ष केंद्रित केले आहे.
© The Indian Express (P) Ltd