नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुन्हा एकदा औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावर आंदोलकांचे कान टोचले आहे. संघाचे माजी सहकार्यवाह भय्याजी जोशी यांनी कबरीचा मुद्दा अनावश्यकपणे उकरून काढला जात आहे. ज्यांची श्रद्धा असेल ते लोक औरंगजेबाच्या कबरीवर जातील, असे स्पष्टपणे नमूद केले. विशेष म्हणजे बंगळुरू येथे झालेल्या संघाच्या प्रतिनिधी सभेदरम्यान अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनीही संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन करत नाही. औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही अशी भूमिका मांडली होती.
नागपूरमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित असताना भय्याजी जोशी यांना प्रसार माध्यमांनी औरंगजेब प्रकरणाबाबत प्रतिक्रिया विचारली असता ते बोलत होते. औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेला वाद अद्याप शमल्याचे दिसत नसून राजकीय वर्तुळात यावर दावे-प्रतिदावे चालू आहेत. औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी, अशी मागणी बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे. नागपूरात यासाठी मोठे आंदोलन करण्यात आले होते. यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दुसऱ्यांदा विश्व हिंदू परिषदेची कानउघाडणी केली आहे. भय्याजी जोशी म्हणााले की, औरंगजेबाच्या कबरीचा विषय अनावश्यकपणे चर्चिला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

औरंगजेबाचा मृत्यू इथे झाला तर त्याची कबर इथेच असणार. काही लोकांची श्रद्धा असेल तर ते तिथे जातील. छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्यासमोर आदर्श आहे. त्यांनी अफजलखानाचीही कबर किल्ल्यावर बनवली आहे. हे भारताच्या उदारतेचे, सर्वसमावेशकतेचे प्रतीक आहे, असे भैय्याजी जोशी म्हणाले.

कबरीचे उदात्तीकरण मान्य नाही : मुख्यमंत्री

औरंगजेबाच्या कबरीला पुरातत्व विभागाचे संरक्षण आहे. त्यामुळे आम्हाला औरंगजेब आवडो अथवा न आवडो कायद्याने साठ वर्षांपूर्वी त्याला संरक्षण मिळाले आहे. म्हणून त्याठिकाणी जो कायदा असेल त्याचे पालन करणे आमची जबाबदारी आहे. औरंगजेबच्या कबरीचा उदात्तीकरण आम्ही होऊ देणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhaiyaji joshi of rss says aurangzeb grave issue is being unnecessarily raised dag 87 sud 02