नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सक्षम असून त्यांचा उत्तराधिकारी शोधण्याची काहीही गरज नाही. २०२९ मध्ये देश पुन्हा त्यांनाच पंतप्रधान म्हणून पाहण्यास इच्छुक असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.नागपूर मध्ये एका कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी संघाच्या स्मृतीमंदिराला भेट दिल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांना नरेंद्र मोदी यांचा वारसदार कोण असेल? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तो नेता बहुतेक महाराष्ट्रातील राहणार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असे राऊत म्हणाले.

यावर मुख्यमंत्र्यांना तुम्ही मोदींचे उत्तराधिकारी राहणार आहात का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सर्वांना विश्वासात घेऊन राज्याच्या कारभार सुरू आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी जे लोक आम्हाला मदत करतील त्या सर्वांना सोबत घेऊनच आम्ही काम करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सक्षम आहेत. त्यांना कुठलीही प्रकृतीची अडचण नाही. त्यामुळे मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याची गरज नाही. ते अजून बरेच वर्ष काम करू शकतात.

२०२९ मध्ये पंतप्रधान म्हणून देश मोदींकडे पाहत आहे. वडील जिवंत असताना त्यांचा उत्तराधिकारी शोधणे ही आमची परंपरा नाही. ही मुघल संस्कृती आहे. तसाही उत्तराधिकारी होण्याची आपला काहीही संबंध नाही, असेही फडणवीस म्हणाले. यावर आरएसएसचे माजी सहकार्यवाह भय्याजी जोशी यांना विचारणा केली असता त्यांनी याबद्दल मला काही माहिती नाही असे स्पष्ट सांगितले.

भय्याजी जोशी नेमके काय म्हणाले

मोदी आणि संघामध्ये दुरावा असल्याचे म्हटले जात होते? असा प्रश्न संघाचे माजी सहकार्यवाह भय्याजी जोशी यांना विचारण्यात आले असता ‘दुरावा वगैरे काही नाही. आम्ही हे मानत नाही असे स्पष्ट सांगितले. तर मोदींचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असेल, संघाची त्याला संमती लागेल, अशी चर्चा आहे?, असेही त्यांना विचारण्यात आले. यावर उत्तराधिकाऱ्याचा सध्या प्रश्नच कुठे आहे. संघात जी परंपरा आहे, त्यानुसार होईल. तो निर्णय संघ घेईल, असे भय्याजी म्हणाले. देवेंद्र फडणवीस उत्तराधिकारी म्हणून चर्चा असल्याबद्दल मला काही कल्पना नाही, असे त्यांनी सांगितले.