अपघाती मृत माकडाचा कृषी अधीक्षक कार्यालय परिसरात पंधरवड्यापूर्वी दफनविधी केल्यानंतर दगडाला शेंदूर फासून समाधीस्थळाची निर्मिती केली गेली. आता मृत माकडाच्या समाधीस्थळानंतर कृषी अधीक्षक कार्यालयाचे बाहेर मुतारी व चर शौचालयाच्या उद्घाटनानिमित्त जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी कार्यालयातच गुरुवारी रात्री सलग दोन तास भजन, कीर्तनाचे आयोजन केले. शासकीय कार्यालयातील या समाधीस्थळ, भजन, कीर्तनाचे भन्नाट उपक्रमाची चर्चा सर्वत्र चांगलीच रंगली आहे.
हेही वाचा >>> चंद्रपूर: मद्यधुंद बसचालकाची विद्यार्थ्याला मारहाण, प्रवाशांशी भांडणाऱ्या चालकाचा विद्यार्थी काढत होता ‘व्हिडीओ’
येथील जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी स्वत:च्या श्रद्धेपोटी शासकीय कार्यालयातील सर्व संकेतांना हरताळ फासण्याचे काम सुरू केले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यांच्या या वर्तणुकीने कर्मचारी सुद्धा त्रस्त झाले आहे. काही दिवसांपूर्वीच रस्त्यावर मृत झालेले माकड त्यांनाी शासकीय वाहनातून कार्यालयात आणले. वरोरा नाका उड्डाण पुलानजीकच्या कृषी भवनाच्या अगदी प्रवेशद्वारावरच त्याचा विधीवत दफनविधी केला. त्याठिकाणी दगड ठेवून शेंदूर फासला. आता त्याला सिमेंट काँक्रिटीकरण केले आहे. माकडाला पुरताना त्यांनी कृषी विभागाला सुद्धा अंधारात ठेवले. या माकड पुरल्यामुळे झाडांना खत मिळते, असे ते सांगतात. एवढेच नव्हे तर कार्यालयीन वेळ संपल्यानंतर आता त्यांनी भजन कीर्तनाचे सुद्धा आयोजन करणे सुरू केले आहे. गुरुवारी कृषी भवनात भजन-कीर्तन ठेवले होते. याची कल्पना एकाही कर्मचाऱ्याला नव्हती. कर्मचारी घऱी गेल्यानंतर भजनाचा कार्यक्रम सुरू झाला. प्रशासनाकडून याची परवानगी सुद्धा घेण्यात आली नव्हती. ध्वनिक्षेपक लावून रस्त्यावरील वाटसरूंना भजनाचा लाभ घेता यावा याचीही व्यवस्था बऱ्हाटे यांनी केली. भजन मंडळी आणि बऱ्हाटे एवढ रात्री अकरा वाजेपर्यंत कार्यालयात होते. या कार्यालयाच्या बाजुला खासगी वाहनतळ आहे. तिथे मुतारी व स्वच्छतागृहाची व्यवस्था केली आहे. त्याचे उद्घाटन केले. त्यामुळे भजन कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती बऱ्हाटे यांनी दिली.
जैविकदृष्ट्या चर शौचालय जमिनीसाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे सर्वाधिकारी कै. तुकारामदादा गीताचार्य यांच्या संकल्पनेतून प्रत्यक्ष चर शौचालय बांधण्यात आले असल्याने मलमूत्राचे रूपांतर हे सोनखतामध्ये होणार आहे. चर शौचालयाचे बांधकाम आनंदराव संभाजी डफ यांनी विनामूल्य पूर्ण केलेले आहे.
– भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा कृषी अधीक्षक, चंद्रपूर