प्राध्यापकांचा पगार आता अनेकांना खुपू लागला आहे. भरपूर पगार घेणारे हे उच्चविद्याविभूषित शिकवत नाहीत, अशी ओरड अनेक दिवसांपासून होतीच. त्याला ताजी फोडणी दिली देशीवादकार भालचंद्र नेमाडेंनी. एका चर्चासत्राच्या निमित्ताने येथे आलेले नेमाडे प्राध्यापकांविषयी त्यांच्या स्वभावाप्रमाणे अतिशय तिखट बोलले. उच्चशिक्षणाची जबाबदारी असलेले हे लोक पाच रुपये पगार देण्याच्या लायकीचे नाहीत, असे नेमाडे प्राध्यापकांच्या समोरच बोलून गेले. तसेही सहावा वेतन आयोग लागू झाल्यापासून प्राध्यापकांचा नाकर्तेपणा चर्चेत होताच. चांगला विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी असलेला हा वर्ग ज्ञानार्जन व ज्ञानसंवर्धनात कमालीचा मागे पडत चालला आहे, हे वास्तव आहे. काही बोटावर मोजता येण्यासारखे अपवाद वगळता सर्वदूर अशीच स्थिती आहे. खरे तर, ज्ञानाच्या क्षेत्रात गतीमानतेची गरज असते, पण प्राध्यापकांच्या वर्तुळात एवढी स्थितीशीलता का आली, हा प्रश्न खरोखरच गंभीर आहे. या मंडळींजवळ वेळ आहे, पैसा आहे व विद्यार्थ्यांना पाहिजे ते ज्ञान देण्याची पात्रता आहे. तरीही अशी स्थिती का, यावर साकल्याने विचार होण्याची गरज आहे. संस्थाचालक खंडणीखोर झाले. १८ अन २० लाख रुपये दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही, अशा स्थितीत नोकरी मिळवणाऱ्यांकडून शिकवण्याची अपेक्षा का बाळगायची, हा युक्तीवाद नेहमी केला जातो. वरकरणी त्यात तथ्य दिसते, पण तसे नाही. खंडणी देऊन नोकरी मिळाली म्हणून त्याचा राग नव्या पिढीवर काढायचा, हेही बरोबर नाही.
वेतन आयोगाने या मंडळींना भरपूर पगार देताच अनुदान आयोगाने काही अटी घातल्या. प्राध्यापकांचे संशोधन, लेखन दिसायला हवे, वैचारिक वर्तुळात व चर्चासत्रात त्यांचा सहभाग दिसायला हवा, तेव्हाच त्यांची स्थाननिश्चिती होईल, असे आयोगाने बजावले. दुर्दैवाने आजचे चित्र उलट आहे. ही सक्रीयता दर्शवण्यासाठी प्राध्यापकांनी पुन्हा शार्टकट शोधले. आयोगाच्या या अटीनंतर या मंडळींकडून संशोधनपर लेखन, पुस्तकांचा अगदी पूर आला. शेकडय़ाने पुस्तके बाहेर पडली. त्यातील बहुतांश चौर्यकर्माची साक्ष देणारी आहेत. आयोगाच्या या अटींमुळेच शैक्षणिक वर्तुळात चर्चासत्रांचे बेसुमार पीक आले. त्याचा दर्जा मात्र कधीच उंचावलेला दिसला नाही. सकाळी नोंदणी करणारे प्राध्यापक दुपारी पसार होतानांचेच चित्र सर्वत्र दिसले. शोधनिबंधांच्या बाबतीत तर बोलायलाच नको एवढी स्थिती वाईट आहे. उचलेगिरीचे उत्तम नमुने कुठेही सादर करायचे असतील तर हे शोधनिबंध बेधडक समोर करावेत, अशी स्थिती आहे. ज्यांच्याकडून मूलभूत संशोधनाची, अभ्यासक्रमाशी संबंधित दर्जेदार लेखनाची अपेक्षा आहे तेच सर्रास चोरी करताना बघून विद्यार्थ्यांच्या मनातून सुध्दा ही मंडळी पार उतरून गेली. आज विद्यार्थीप्रिय प्राध्यापक शोधायचा असेल तर खूप भटकावे लागेल, अशी अवस्था आहे. विद्यार्थ्यांचा शिक्षणातील रस कमी झाला. त्यांनाच वर्गाची गरज उरली नाही, हा या मंडळींकडून केला जाणारा युक्तीवाद तद्दन खोटा व कातडीबचाऊ आहे. जे प्राध्यापक नेमाने चांगले शिकवतात त्यांचे वर्ग आजही तुडूंब भरलेले दिसतात. अशा वर्गांची संख्या लक्षणीयरित्या घटते आहे, हे मात्र खरे. संशोधन, पुस्तके लिहिणे हे सर्वाना जमत नाही, हे मान्य, पण चांगले शिकवणे सहज जमता येण्यासारखे आहे, तेही ही मंडळी करताना दिसत नाही. शिक्षककक्षात पाय ताणून झोपणे, राजकारणावर वायफळ गप्पा मारणे, वेतन व भत्त्यावर गंभीर चर्चा करणे, यातच अनेकांना स्वारस्य असल्याचे चित्र सर्वदूर दिसते. स्वत:चा दर्जा स्वत:हूनच खालावून घेण्यात कारणीभूत ठरलेली ही मंडळी कधीतरी सुधारेल का, ही शंकाच आहे.
एकेकाळी प्राध्यापकांविषयी समाजात आदर होता. या मंडळींच्या व्यासंगाची चर्चा तेव्हा व्हायची. त्यांचा सहवास मिळावा म्हणून अनेकजण धडपडायचे. आज असे चित्र नाही. तेव्हा विविध सामाजिक उपक्रमात, समाज परिवर्तनाच्या चळवळीत प्राध्यापकांचा सहभाग ठरलेला असायचा. आतातर अशा सार्वजनिक ठिकाणी ही मंडळी क्वचितच दिसते. साधे वर्तमानपत्र सुध्दा महाविद्यालयात जाऊन वाचू, अशी विचार करणारी ही मंडळी एवढी आत्मकें द्री का होत गेली, यावरच आता कुणीतरी संशोधन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. राज्याला विविध विधायक चळवळीचा मोठा इतिहास आहे. यापैकी अनेक चळवळींचे नेतृत्व प्राध्यापकांनी केले. आताचे प्राध्यापक तर हे चळवळ प्रकरण विसरूनच गेले आहेत. अभियांत्रिकीचे क्षेत्र सोडले तर शिक्षणाच्या क्षेत्रातला नवा विचारही या मंडळींकडून कधी समोर येताना दिसत नाही. एकेकाळी समाजाला वैचारिकदृष्टय़ा प्रगल्भ करणारा हा वर्ग आता विद्यार्थ्यांना सुध्दा प्रगल्भ करण्यात अपयशी ठरू लागला आहे. विद्यार्थी व प्राध्यापकांमधील नाते एकमेकांना पूरक असायला हवे, पण तशी कुठलीही खूण कोणत्याही महाविद्यालयात दिसत नाही. नवे तंत्रज्ञान, त्याद्वारे मिळणारे शिक्षण ही प्रणाली विद्यार्थ्यांनी आत्मसात केली, पण प्राध्यापक त्यात बरेच मागे असल्याचे चित्र दिसते. शिकवताना या प्रणालीचा वापर करणारे फार थोडे आहेत. हे असे का झाले, यावर मंथन होणे गरजेचे आहे. वेतनातील वाढ या मंडळींना अधिक कार्यक्षम व विचारप्रवर्तक बनवेल, ही अपेक्षाच फोल ठरली आहे. यामुळे एका पिढीचेच आपण नुकसान करत आहोत, याचेही भान या मंडळींना असेल का, हा खरा प्रश्न आहे व तीच नेमाडेंच्या मनातील खरी सल आहे.
– देवेंद्र गावंडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा