भंडारा : जिल्ह्यात सध्या पावसाने किंवा पुराने रस्ते आणि पूल वाहून जाण्याच्या घटना घडत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी लाखांदूर ते पवनी या मार्गावरील जुनोना गावाला जोडणाऱ्या मार्गावरील रस्ता दुसऱ्याच पावसाने वाहून गेल्याची घटना घडली असताना आता मोहाडी तालुक्यातील नाल्यावरील पूल वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला हा पूल १८ आठवडेही टिकू शकला नाही. त्यामुळे या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोहाडी तालुक्यातील चिचखेडा येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) सन २०२२-२३ चे स्मशानभूमीवरील नाल्यावर तब्बल १८,७३,४१६ रुपये खर्चून पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुरामध्ये या पुलाला ठिकठिकाणी तडे जाऊन पावसाने हा पूल वाहून गेला. सदर बांधकाम दिनांक २ एप्रिल २०२४ रोजी सुरू झाले असून दिनांक १० जून २०२४ रोजी काम पूर्ण झाले होते. मात्र दीड महिन्यातच पावसाने खचून गेल्यामुळे या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा – गोंदिया : वैनगंगा, बाघ नदी उफाळली, सहा गरोदर महिलांना अखेर…

सदर बांधकामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असून जनतेच्या पैशाचे अपव्यय होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. सदर काम सुरू असतानाच गावकऱ्यांनी वारंवार ग्रामपंचायत साचिवांकडे व अभियंत्यांकडे तोंडी तक्रार केली होती मात्र भ्रष्टाचाराने आपले हात ओले केले असलेल्या प्रशासनाने अजिबात लक्ष दिले नाही. आता मात्र साधा एक पूरसुद्धा एक महिन्याआधी तयार झालेला पूल सहन करू शकला नाही. अवघ्या ४४ दिवसांत वाहून गेले. तरी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर सार्वजनिक पैशाचा अपहार व बांधकामाकडे गुन्हेगारी दुर्लक्ष केल्याबद्दल फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी राजकीय कार्यकर्ते कॉम्रेड वैभव चोपकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रा. प. सदस्य रूपेश सिंदपुरे, अनिल गाढवे यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे.

सदर प्रकरणावर एका आठवड्यात कारवाई झाली नाही तर प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी कॉम्रेड वैभव व गावकऱ्यांकडून देण्यात आला आहे.

भंडारा जिल्ह्यात पूरस्थिती; वैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडली

मध्यप्रदेशात सुरू असलेल्या पावसामुळे संजय सरोवर, पुजारी टोला आणि धापेवाडा धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे शहरातून वाहणारी वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. आज वैनगंगा नदीने धोक्याची पातळी (२४५.५०) ओलांडली. यामुळे कारधा येथील पुलावरून दोन फूट पाणी वाहत होते. जिल्ह्यातील अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. प्रशासनाने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.

हेही वाचा – भाजपच्या गडात अमित शहा विरोधात शिवसैनिक आक्रमक

मंगळवारी गोसीखुर्द धरणाची २५ दारे दीड तर आठ दारे एक मीटरने उघडण्यात आली होती. त्यातून ८८९४.३८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आज सकाळपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. मागील आठ दिवसांपासून झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरांची पडझड झाली. शेकडो नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले. लाखांदूर, भंडारा, पवनी येथे जिल्हा शोध व बचाव पथक तसेच ‘एसडीआरएफ’चे पथक तैनात करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, ‘बॅकवॉटर’मुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. कारधा येथील तीन आणि गणेशपूर येथील ११ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

महाराष्ट्र-मध्यप्रदेशचा संपर्क तुटला

मध्यप्रदेश आणि गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मध्यप्रदेशातील पुजारी टोला, संजय सरोवर या धरणाची दारे उघडण्यात आली आहेत. तेथील पाणी जिल्ह्यातील बावनथडी प्रकल्पाच्या माध्यमातून वैनगंगा नदीत प्रवाहित होत आहे. परिणामी, तुमसर तालुक्यातील बपेरा येथील बावनथडी पुलावरून तीन फूट पाणी वाहत असून महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhandara a shocking incident has taken place in mohadi taluka where the bridge over the drain has been washed away ksn 82 ssb