एक जण अटकेत
भंडारा : अरोमिरा नर्सिंग कॉलेजने एएनएमचे शिक्षण घेत असलेल्या १८ विद्यार्थिनींची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर काल रात्री अरोमिरा कॉलेजच्या संस्था चालक वर्षा अविनाश साखरे, प्राचार्या सुसन्ना थालापल्ली, कर्मचारी राकेश निखाडे व जयश्री कडू यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गुन्हा दाखल होताच राकेश निखाडे याला अटक करण्यात आली तर संस्था चालक वर्षा अविनाश साखरे, प्राचार्या सुसन्ना थालापल्ली व जयश्री कडू या तिघी जणी रात्रीच फरार झाल्यात.
हेही वाचा >>> विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे नागपूर कराराची होळी, केंद्र व राज्य सरकारचा निषेध
अरोमिरा स्कूल ऑफ नर्सिंग तथा अरोमिरा नर्सिंग कॉलेजने एएनएमचे शिक्षण घेत असलेल्या १८ विद्यार्थिनींची फसवणूक केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पिसाळ यांच्या तपासात निष्पन्न झाल्यानंतर काल रात्री पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या आदेशानुसार अरोमिरा कॉलेजच्या संस्था चालक वर्षा अविनाश साखरे, प्राचार्या सुसन्ना थालापल्ली, कर्मचारी राकेश निखाडे व जयश्री कडू यांच्या विरोधात भंडारा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. राकेश निखाडे याला रात्री उशिरा अटक होताच त्याने तब्येतीचा बहाणा केल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या संस्था चालक वर्षा साखरे या फरार आहे. राकेश निखाडे फरार होऊ नये म्हणून त्याला दुपारी १ वाजता पासून पोलीस ठाण्यात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. मात्र मुख्य आरोपी असलेल्या वर्षा साखरे या सुध्दा फरार होऊ शकतात याची कल्पना असताना भंडारा पोलिसांनी त्यांना विशेष सुट का दिली असा प्रश्न ही उपस्थित होतोच. आधीच पोलीस विभागाकडून कारवाई करण्यास दिरंगाई झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना पोलीस यापुढे काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.