भंडारा : साकोली विधानसभेची लढत अतिशय अटीतटीची आणि रंगतदार झाली. भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविणारे महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांना अवघ्या २०८ मतांनी पराभव पत्करावा लागला. त्यांच्या पराभवामुळे महायुतीत सुतकी वातावरण निर्माण झाले असे असतानाच राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाने भाजपच्या जिल्हाध्यक्षांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले. संतापाच्या भरात या नगर सेवकाने भाजप जिल्हाध्यक्षांना शालजोडीतून फटके हाणले. त्यांच्या संवादाची ध्वनिफीती व्हायरल झाल्यानंतर आता भाजप जिल्हाध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साकोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नाना पटोले यांच्या विरोधात महायुतीतून भाजपच्याच व्यक्तीला उमेदवारी देण्यात यावी असा अट्टाहास तेथील भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला होता. मात्र ऐनवेळी कुणबी उमेदवार देण्याच्या उद्देशाने पक्षश्रेष्ठींनी राष्ट्रवादीचे अविनाश ब्राम्हणकर यांचा भाजप पक्षात प्रवेश करवून त्यांना तिकीट दिले. राष्ट्रवादीतून आयात केलेल्या उमेदवारावर भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त करीत बंडखोरी केली आणि सोमदत्त करंजेकर यांच्या रूपाने अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवला. त्यामुळे भाजपची दोन गटात विभागणी झाली आणि काहींनी अविनाश ब्राह्मणकर तर काहींनी सोमदत्त करंजेकर यांचा जोरदार प्रचार केला. मतमोजणीच्या दिवशी तळ्यात मळ्यात अशा खेळ चालला आणि सरतेशेवटी विजयी उमेदवाराची घोषणा झाली. नाना पटोले यांना २०८ मतांनी निसटता विजय मिळाला. त्यांना ९६,७९५ मते मिळाली. दुसऱ्या क्रमांकावर असलेले भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांना ९६,५८७ मते घेतली.

हेही वाचा : ‘मुख्यमंत्री देवाभाऊच!’ नागपुरात भाजप महिला आघाडीचे टेकडी गणपतीला साकडे..

ब्राह्मणकर यांना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी केले होते. त्यामुळे विजयाच्या अगदी जवळ असताना ब्राह्मणकर यांचा पराभव राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या पचनी पडला नाही. भाजपमुळेच ब्राम्हणकर यांना पराभवाची धूळ चाखावी लागली अशा चर्चा राष्ट्रवादीच्या गटात रंगल्या. निवडणुकीत खासदार प्रफुल्ल पटेल आणि राजू जैन यांनी रात्रीचा दिवस केलेला असताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी योग्य नियोजन न केल्यामुळे आपण पराभूत झालो, असा आरोप राष्ट्रवादीचा एक नगरसेवक धनू व्यास यांनी केला. त्यांनी थेट भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे यांना कॉल केला. बाळबुधे यांना सुरवातीला व्यास यांच्या बोलण्याचा अर्थ आणि ओघ कळलाच नाही. मात्र जसजसा संवाद पुढे गेला तसा ब्राह्मणकर यांच्या पराभवास आपणच कारणीभूत आहोत, असा आरोप व्यास करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी व्यास यांना दारूच्या नशेत बरळत आहेस का, असेही विचारले मात्र आपण परमात्मा एक सेवकचे अनुयायी असून संपूर्ण शुध्दीत बोलत असल्याचे व्यास म्हणाले. प्रकाश बाळबुधे यांनी व्यास यांना टोमणे मारू नका , आम्ही काम केले नसेल तर सरळ काम केले नाही असे बोलला असे खडसावले. शिवाय आम्ही मुद्दाम अविनाश ब्राह्मणकर यांना पाडले असे तुला सूचित करायचे आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मात्र त्यावर धनु व्यास यांनी तुमच्या मनात असे असेल म्हणून तुम्ही असे बोलता असे बोलून बाळबुधे यांना चिमटा काढला. व्यास हे लाखनीचे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. निवडणुकीत त्यांच्यावर समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhandara bjp district president honored even after mahayuti candidate defeated in vidhan sabha election 2024 ksn 82 css