भंडारा : भंडारा गोंदिया मतदारसंघात १८ उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत भाजपचे अधिकृत उमेदवार विद्यमान खासदार सुनील मेंढे आणि काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्यात आहे. सध्या या दोन्ही उमेदवारांची विविध संघटना, संस्था, छोटे पक्ष यांच्याकडून पाठिंबा मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच माजी आमदार चरण वाघमारे यांच्या जन विकास फाउंडेशनचा पाठिंबा मिळावा यासाठी खासदार सुनील मेंढे यांनी मागच्या दारातून तर नाना पटोले यांनी समोरून त्यांची भेट घेतली. मात्र चरण वाघमारे यांनी कार्यकर्ते ठरवतील त्याच उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आता चरण वाघमारे कोणाकडे झुकते माप देतील, नानाभाऊ की सुनीलभाऊंना समर्थन मिळेल हा सस्पेन्स कायम असून जि. प. निवडणुकीप्रमाणे आताही चरण वाघमारे “गेम चेंजर” ठरू शकतात अशी चर्चा आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक लढविणारा प्रत्येक पक्ष किंवा उमेदवार इतर घटकपक्ष, संघटनांचा पाठिंबा मिळविण्यासाठी वणवण फिरत आहे. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातही हीच स्थिती आहे. समर्थन मिळविण्यासाठी उमेदवार अनेकांचे हातपाय जोडत आहेत. त्यातही ज्यांचा राजकीय प्रभाव किंवा वजन जास्त त्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी तर उमेदवार किंवा पक्षश्रेष्ठी त्यांच्यापुढे अक्षरशः लोटांगण घालत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांच्या नावाची चर्चा होती असे विकास फाउंडेशनचे संस्थापक तथा माजी आमदार चरण वाघमारे यांची मोहाडी तुमसर विधानसभा क्षेत्रात असलेली लोकप्रियता बघता उमेदवारांनी त्यांच्याकडे समर्थनासाठी साकडे घातले आहे. त्यांचे समर्थन मिळाल्यास मतांच्या बेरजेत मोठा फरक पडू शकतो हे माहिती असल्याने भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार त्यांना गळ घालत आहेत. मात्र चरण वाघमारे यांनी सध्या तटस्थ भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे ज्या चरण वाघमारे यांच्या पाठिंब्यासाठी भाजप उमेदवार मनधरणी करीत आहे त्याच वाघमारेंना कधीकाळी (विधानसभा निवडणूक) भाजपने उमेदवारी नाकारली होती. तर दुसरीकडे या निवडणुकीत काँगेसने उमेदवारी देण्याचे स्वप्न दाखवून वाघमारे यांना ऐनवेळी तोंडघशी पाडले. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांवर त्यांच्या समर्थकांची आणि कार्यकर्त्यांची नाराजी आहे.
भाजप आणि काँग्रेसने आपल्या नेत्यावर कायम अन्याय केल्याची भावना आता त्यांचे कार्यकर्ते बोलून दाखवीत आहेत. भंडारा जि. प. निवडणुकीच्या वेळी बंडखोरी केल्याच्या आरोपाखाली भाजपने वाघमारे यांना पक्षातून निलंबित केले त्यावेळी चरण वाघमारे यांच्या समर्थांनामुळेच काँग्रेसला जिल्हा परिषदेत सत्ता प्रस्थापित करता आली होती. भाजपने निलंबित केल्यानंतर वाघमारे भारत राष्ट्र समितीत गेले होते. मात्र, भारत राष्ट्र समितीचे काम महाराष्ट्रात बंद झाल्यानंतर खचून न जाता त्यांचे सर्व कार्यकर्ते पुन्हा नव्या जोमाने विकास फाऊंडेशनच्या कामाला लागले. त्यातच लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच ते पुन्हा संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आले. मात्र काँगेस पक्षातून उमेदवारी देण्याची शाश्वती देणाऱ्या काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीसुद्धा ऐनवेळी त्यांना धोका देत नवख्या उमेदवाराचे नाव पुढे केले. यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून चरण वाघमारे यांची अवहेलनाच केली गेल्याचे बोलले जाते. असे असले तरी वाघमारेंचा प्रभाव पाहता या निवडणुकीत त्यांना डावलणे उमेदवारांना परवडणारे नाही. त्यामुळे मतांचा जोगवा मागण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने पुन्हा चरण वाघमारे यांची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे. सुनील मेंढे यांनी वाघमारे यांची गुप्त भेट घेत समर्थन देण्यासाठी विनवणी केली. तर नाना पटोले यांनी वाघमारे यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेत झाले गेले विसरून आमच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहावे अशी गळ घातली. मात्र पाठिंबा कुणाला द्यायचा हे आता माझे कार्यकर्तेच ठरवतील अशी भूमिका वाघमारे यांनी स्पष्ट केली.
समर्थनाचा निर्णयही लोकशाही मार्गाने मतदान घेऊन घेण्याचा निर्णय वाघमारे यांनी घेतला. यासाठी यांच्या जन विकास फाऊंडेशनच्या वतीने कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी गुप्त मतदान केले. कार्यकर्त्याला दिलेल्या चिठ्ठीवर समर्थन द्यावयाच्या उमेदवाराचे नाव, उमेदवार नसेल तर नोटा असे पर्याय टाकावयाचे होते. या सर्व चिठ्ठ्या एका पेटीत बंद केल्या आहेत. ही पेटी १० एप्रिलला उघडून ज्याच्या बाजूने बहुमत असेल, त्याला समर्थन जाहीर केले जाईल, असे चरण वाघमारे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – नाशिकमध्ये महायुतीत अचानक शांतता
उल्लेखनीय बाब म्हणजे दिवंगत यादवराव पडोळे यांच्याशी वाघमारे यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचे काही ऋणही वाघमारे यांच्यावर होते. त्यामुळे वाघमारे यांनी कार्यकर्त्यांच्या मर्जीने पाठिंबा जाहीर करू असे कितीही सांगितले तरी त्यांचा कल काँग्रेसच्या उमेदवाराकडेच असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. मात्र वाघमारे यांनी ज्या उमेदवाराला पाठिंबा नाकारला त्याला या निवडणुकीत जिंकणे अवघड जाणार असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत चरण वाघमारे हे गेम चेंजर ठरू शकतात अशी जोरदार चर्चा आहे.