भंडारा : चार वर्षाचा चिमुकला नील घनदाट जंगलव्याप्त टेकडीवर अचानक बेपत्ता होतो. तीन दिवस त्याच्या शोधात पोलीस संपूर्ण जंगल परिसर पिंजून काढतात. मात्र, त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नाही. अखेर चौथ्या दिवशी एखाद्या वन्य प्राण्याने त्याची शिकार केली असावी आणि आता त्याच्या कुजलेल्या मृतदेहाचा दुर्गंध येईल असा विचार करून पोलीस पुन्हा शोधमोहीम सुरू करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टेकडीवर २ किमी अंतरावर चढल्यानंतर एका झाडाच्या खाली खड्ड्यात चिमुकला नील पोलिसांच्या दृष्टीस पडतो. तब्बल तीन दिवसानंतर रहस्यमयरित्या तो सुखरूप सापडतो. तीन दिवस घनदाट जंगलात कसा राहिला, टेकडीवर कसा चढला, तो कुणासोबत गेला की त्याला कुणी नेले, त्याच्यासोबत काय झाले, त्याला परत कुणी आणून सोडले असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. मात्र, तो सापडल्यानंतर पोलिसांनी त्याला ‘तुझे वहा कोण ले के गया था ‘ असे विचारले असता ‘हरा मामा’ असे नील सतत सांगत आहे. त्यामुळे हा हरा मामा कोण, त्याने नीलला का आणि कोठे नेले आणि परत का आणून सोडले हे कोडे सोडविणे आता गोबरवाही पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.

हेही वाचा – गडचिरोली : दोन जहाल महिला नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, तब्बल ५३ गुन्ह्यांची…

तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वन परिक्षेत्रांतर्गत येणारे चिखला हे छोटेसे गाव. टेकडीच्या पायथ्याशी चिखला माईन्सचे कॉटर आहेत. याच कॉटरमध्ये नीलचा मामा आतिश दहिवले त्याच्या विधवा आईसोबत राहतो. पतीच्या निधनानंतर आरतीसुद्धा मुलगा नील आणि मोठी मुलगी हेमांगी या दोघांना घेऊन भावाकडे राहण्यास आली. नील शाळेत जात नसल्याने दिवसभर आजी त्याची त्याचा सांभाळ करते. आठ दिवसांपूर्वी १ जानेवारी रोजी नील नेहमीप्रमाणे अंगणात खेळत होता. घराच्या मागच्याच भागात त्याची आजी भांडे घासत होती. खेळता खेळता बहिणीच्या पाठमागे नील टेकडीच्या दिशेने जाऊ लागला.

अंधार पडायच्या आत घरी परतायचे म्हणून नीलची बहिण हेमांगी आणि तिच्या शेजारच्या काकू लगबगीने टेकडीवर चढू लागल्या. जंगलव्याप्त टेकडीवर असलेल्या शंकराच्या मंदिरात जाण्यासाठी दोघी सायंकाळी निघाल्या होत्या. बहिणीच्या आणि शेजारच्या काकूच्या पाठीमागे डोलत डोलत ‘नील’ही जाऊ लागला. काही अंतर गाठल्यावर नील मागे येत असल्याचे लक्षात येताच शेजारच्या काकूंनी त्याला घरी परत जाण्यास सांगितले. टेकडी चढताना त्या दोघींनी मागे वळून पाहिले, नील दृष्टीस न पडल्याने तो घरी गेला असावा असा समज करून त्या दोघी पुढे निघाल्या. मात्र त्या क्षणानंतर पुढचे तीन दिवस नील बेपत्ता राहिला.

घटनेच्या दिवशी त्याचा मामा माईन्समध्ये कामाला गेला होता तर दोन दिवसांपूर्वी आई आरती विधवा पेंशन योजनेचे पैसे जमा झाले का ते पाहण्यासाठी सासरी नंदूरबार येथे गेली होती. ती परतीच्या वाटेवर असताना भुसावळ जवळ पोहचल्यावर नील बेपत्ता झाल्याचे तिला सांगण्यात आले. आरतीला पोहोचायला वेळ लागणार असल्याने मामानेच नील बेपत्ता झाल्याची तक्रार गोबरवाही पोलीस ठाण्यात दिली.

नील बेपत्ता झाल्यानंतर नरबळीसाठी त्याचे अपहरण करण्यात आल्याच्या चर्चांना उधाण आले तर कुठे त्याची शिकार झाल्याची शक्यता वर्तवली जावू लागली. लोकसत्ता प्रतिनिधीने नील सापडला त्या जागेवर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता काही धक्कादायक वास्तव समोर आले. ज्या ठिकाणी शेजारच्या काकूने नीलला परत जाण्यास सांगितले त्या जागेपासून दोन फाटे फुटले आहेत. एक मार्ग गावाकडे तर दुसरा जंगलव्याप्त टेकडीकडे जातो. पोलिसांना तो टेकडीच्या मध्यंतरी असलेल्या ज्या खड्ड्यात गवसला त्या ठिकाणी सहजपणे कुणालाही जाणे अशक्य आहे. या टेकडीवर मग्निज चोरांचा सुळसुळाट असल्याने वर जाण्यासाठी एक पुसट पायवाट आहे. ठिकठिकाणी टेकडीचे खणन करून चोरांनी मॅग्निज पोतल्यांमध्ये भरून ठेवलेले आहे. मात्र नील बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांची गस्त सुरू झाल्यामुळे चोरटे ते पोते ठेवून पसार झाले आहेत.

टेकडीवरील चढाव, वर जाणारा खडतर मार्ग, घनदाट झाडे झुडूपे, दिवसा ढवळ्या जाणवणारी जंगलातील भयावह शांतता आणि हिंस्त्र श्वापदांचा मुक्तसंचार अशा परिस्थितीत कोणताही लहान मुलगा स्वतःहून टेकडीवर चढून जाणे शक्य नाही आणि गेल्यास अन्न पाण्याविना राहणे अशक्यप्राय गोष्ट आहे.

गोबरवाही पोलीस ठाण्याचा कारभार हाती घेताच ठाणेदार शरद शेवाळे यांच्यापुढे नीलला शोधून काढणे हे पहिले मोठे आव्हान होते. पोलीस निरीक्षक शरद शेवाळे सांगतात की, त्यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गीते आणि त्यांच्या चमूने नीलला शोधण्यासाठी रात्रीचा दिवस करून टेकडीसह आजूबाजूचा संपूर्ण जंगल परिसर पिंजून काढला. तीन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर जेव्हा नील दिसला तेव्हा डॉग स्कॉट बोलावून तपासाची चक्रे वेगाने फिरविता आली असती. मात्र त्याची अवस्था बघता त्याच्यावर प्राथमिक उपचार करणे गरजेचे होते.

हेही वाचा – अमरावती : खासगी बसचालकांना दणका, आरटीओकडून दंडात्मक कारवाई

प्रथम आरोग्य केंद्र आणि नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याच्यवर उपचार करण्यात आले. नील सापडला असला तरी आता त्याच्या बेपत्ता होण्याचे गुढ उकलून काढणे हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे ठाणेदार शेवाळे सांगतात. एक तरी धागा हाती लागावा यासाठी खडतर टेकडीवर वारंवार जाऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली असून काही संशयिताची चौकशी सुरु आहे.

मागील तीन दिवसांपासून पोलीस नीलला बोलते करण्यासाठी नानाविध युक्त्या करीत आहे. तू कुणासोबत गेला होता असे विचारल्यावर नील ‘ हरा मामा के साथ वहा गया था’ असे सांगतो. ‘हरा मामाने खाने को क्या दिया ‘ असे विचारताच ‘ दाल भात ‘ असे उत्तर तो देतो. मात्र त्या पहाडावर पुन्हा जायचे का असे विचारल्यावर तो ‘नहीं ना नहीं ना’ असे ओरडू लागतो.

झोपेत ‘नहीं नहीं’ असे ओरडतो

निलची आई आरती सांगते की, ज्या दिवशी नील सापडला त्या दिवशी रात्री झोपेतून तो अनेकदा दचकून उठला आणि ‘नहीं नहीं’ असे बोलून रडत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhandara chikhla village missing kid neel forest found ksn 82 ssb