भंडारा : अंगणात खेळत असलेला एक चार वर्षाचा चिमुकला अचानक बेपत्ता झाला. दोन दिवस शोध मोहीम चालते मात्र त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नाही. जंगलव्याप्त गाव असल्याने हिंस्त्र प्राण्याने त्याची शिकार तर केली नसेल अशा शंका कुशंकासह नाना तर्कवितर्क लावले जात होते. मात्र आज तिसऱ्या दिवशी घनदाट जंगलात एका झाडाखाली हा चिमुकला बसलेला दिसला आणि सगळेच थक्क झाले. ही काल्पनिक कथा नसून तुमसर तालुक्यातील जंगलव्याप्त चिखला गावात घडलेली सत्य घटना आहे. या घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला असून ही घटना एखाद्या दैवी चमत्कारापेक्षा कमी नसल्याचे बोलले जात आहे. नील मनोज चौधरी असे असे या चिमुकल्याचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुमसर तालुक्यातील चिखला गावात आईसोबत मामच्या घरी राहणारा नील बुधवारी १ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास अचानक बेपत्ता झाला. वनविभाग आणि पोलिसांनी शोधमोहिम राबविली. श्वानपथकालासुद्धा पाचारण करण्यात आले होते. मात्र दोन दिवस त्याचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. दोन वर्षांपूर्वी निलच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर आई आरती नीलला घेऊन माहेरी चिखला या गावी भाऊ अतिश दहिवले यांच्याकडे राहत आहे. घटनेच्या दिवशी नील अंगणात खेळत होता. अंधार पडल्यानंतर त्याला घरात घेण्यासाठी त्याची आई घराबाहेर पडली असता नील कुठेच दिसला नाही. कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी आजूबाजूच्या वस्तीत निलचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र त्याचा कुठेच शोध लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी गोबरवाही पोलिस स्टेशन गाठून निल बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी चिखला परिसरात नाकाबंदीचे आदेश दिले. मध्यप्रदेश राज्याची सीमा लागून असल्याने पोलिसांनी त्यानुरूप शोधमोहीम राबवली. चिखला हे गाव नाकडोंगरी वन परिक्षेत्राअंतर्गत येत असून या परिसरात हिंस्त्र श्वापदांचा वावर आहे. त्यामुळे नीलची शिकार तर झाली नाही असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात होते. अखेर तीन दिवसानंतर नील सुखरूप सापडला.

हेही वाचा – VIDEO : धक्कादायक ! खरेदी केंद्रावरच शेतकऱ्याने अंगावर घेतले पेट्रोल! ओरडत म्हणाला…

हेही वाचा – निवडणुकीनंतर ग्राहकांवर स्मार्ट वीज मीटर लादले, शासनाची ही घोषणा…

नीलच्या मामांचे घर टेकडीच्या पायथ्याशी आहे. सायंकाळी अंगणात खेळता खेळता नील त्याच्या बहिणीच्या पाठीमागे टेकडीवर चढू लागला. बहिणीने त्याला घरी परत जा असे सांगितले त्यानंतर तो तिला दिसला नाही त्यामुळे तो घरी परतला असे तिला वाटले. मात्र नंतर तो गावातील एका बाईच्या पाठीमागे जंगलात गेला. तिने ही त्याला घरी परत जाण्यास सांगितले. मात्र रात्री नील घरी परत न आल्याने कुटुंबीयांना चिंता वाटू लागली. त्यांनी सर्वत्र शोध घेतला. अखेर तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. आता तीन दिवस नील जंगलात झाडाखाली कसा राहिला हे रहस्य त्याच्याशीच बोलल्यावर उलगडेल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhandara child lost found safe under a tree in a dense forest incident in chikhla village of tumsar taluka ksn 82 ssb