भंडारा : माजी आमदार चरण वाघमारे यांनी नुकताच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विधानसभेची उमेदवारी मिळविण्यासाठीच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे उघड आहे. मात्र, त्यांच्या या ‘एन्ट्री’मुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले आहेत. कालपर्यंत आपल्यालाच तिकीट मिळावे, यासाठी एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्यांना नेत्यांनी एकत्र येऊन वाघमारे यांच्या विरोधात वज्रमूठ बांधली आहे. वाघमारे यांना उमेदवारी दिल्यास सामूहिक राजीनामे देणार, असा आक्रमक पवित्रा दोन्ही पक्षांतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
महाविकास आघाडीत तुमसर मतदारसंघावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी दावा केला होता. आघाडीतील या दोन पक्षांत या जागेसाठी रस्सीखेच सुरू असतानाच ‘दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ’ झाला. वाघमारे यांनी शरद पवार गटात प्रवेश घेतला आणि तुमसर विधानसभेचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. यामुळे राष्ट्रवादीसह काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. विविध पक्ष बदलवणारे आणि राजकीय निष्ठेशी कुठलाही संबंध नसलेल्या वाघमारे यांना शरद पवार यांनी पक्षात प्रवेश आणि उमेदवारी कशी काय दिली, असा थेट सवाल आता जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांनी उपस्थित केला आहे. निष्ठावंतांना डावलून सत्तापिपासू लोकांना पक्षात स्थान मिळत असेल तर निष्ठावंतांची वज्रमूठ तयार करा, अशी भूमिका शरद पवार गटाने घेतली आहे. वाघमारे यांना उमेदवारी दिल्यास सामूहिक राजीनामे देणार, असा इशारा त्यांनी दिला आहे. वाघमारे यांना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांच्यासाठी काम करणार नाही, असे महाविकास आघाडीचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते उघडपणे सांगत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पत्रपरिषद घेऊन त्यांची भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा – संविधानाचा मुद्दा, श्याम मानव अन् भाजपची राडा संस्कृती
हेही वाचा – निवडणुकीसाठी काँग्रेसचा मध्यवर्ती अड्डा, मुंबई मुख्यालय ते बूथ थेट संपर्क
काँग्रेसकडून विरोध का?
लोकसभा निवडणुकीत वाघमारे यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, वाघमारे यांचा शरद पवार गटातील प्रवेश अनेकांना खटकला. जिल्हा परिषद निवडणुकीत वाघमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध केला, त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्यांना आता विरोध आहे. मात्र, लोकसभेत काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतरही काँग्रेस त्यांच्या नावाचा विरोध का करत आहे, यावर आता चर्चा रंगू लागली आहे.
© The Indian Express (P) Ltd