भंडारा : वादग्रस्त शेत जमिनीवर कोणत्याही प्रकारचे रस्त्याचे बांधकाम करण्यात येऊ नये असे न्यायालयाचे लेखी आदेश असताना कंत्राटदाराने शेतातून रस्त्याचे बांधकाम सुरू केले. कंत्राटदाराने न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करीत स्वमर्जिने रस्त्याचे बांधकाम केल्यामुळे कंत्राटदाराविरोधात वरठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, सिरसी येथील रहिवासी राजेश रतिराम मदनकर, (वय ४४) यांची गावात शेती आहे. या शेत जमिनीच्या गट क्रमांक ३६ मधून सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा यांच्या वतीने कंत्राटदार सुरेश हिरालाल चकोले यांनी सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू केले. कोणताही मोबदला न देता जमीन संपादित केल्यामुळे शेतमालिक मदनकर यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर १० जानेवारी रोजी न्यायलयाने या वादग्रस्त जमिनीवर सुरू असलेले रस्त्याचे बांधकाम तात्पुरता थांबवावे असे लेखी आदेश दिले.असे असतानाही कंत्राटदार चकोले यांनी ४ फेब्रुवारी पासून पुन्हा सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरूच केले. त्यामुळे चकोले यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करीत त्यांच्या विरोधात मदनकर यांनी वरठी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चकोले यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मदनकर यांनी तक्रारीतून केली आहे.

Story img Loader