नागपूर : भंडारा जिल्ह्यातील जांब-कांद्री वनपरिक्षेत्र अंतर्गत पिटेसूर गावाजवळ सुवर्णा नियत क्षेत्र (बिट) क्रमांक ५३ राखीव वनात बुधवार दिनांक चार डिसेंबर रोजी रात्री आठ ते नऊ वाजताच्या दरम्यान वाघाने एका गावकाऱ्यावर हल्ला केला. यात ५० वर्षीय गावकरी जागीच ठार झाला. मृतकाचे नाव लक्ष्मण डोमा मोहणकर असून तो पिटेसूरचा रहिवासी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूर जिल्ह्यात काय झाले?

चार दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात महिला मृत्युमुखी पडली. सावली तालुक्यातील निलसनी पेडगाव गावानजीकच्या जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाच्या हल्ल्यात रेखा मारोती येरमलवार (५५) ही महिला ठार झाली. ही घटना शनिवार, ३० नोव्हेबर रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आली. येथील रहिवासी रेखा मारोती येरमलवार या शुक्रवारला सकाळी ११ वाजताच्या सुमारास झाडण्या कापण्यासाठी जंगलात गेली होती. नाल्याजवळ झाडण्या कापत असताना दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. यात रेखा जागीच ठार झाल्या.

हेही वाचा – मुख्यमंत्रीपद नागपूरला आणि या आमदारांनाही मंत्रिपद संधी…आठपैकी तब्बल…

भंडारा जिल्ह्यात काय झाले?

तर आता भंडारा जिल्ह्यात मृतक लक्ष्मण मोहनकर रात्री तलावावर मच्छी पकडण्यासाठी निघालेला होता. उशिरापर्यंत घरी परत न आल्यामुळे गावकऱ्यांनी रात्री अकरा वाजता शोध मोहीम सुरू केली तेव्हा त्याचे मृत शरीर जंगल भागात मिळाले. पुढील कार्यवाही वन विभाग करीत आहे. मृत शरीराचे मोहाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. या परिसरातील मनुष्यहानीची ही पहिलीच घटना आहे.

राज्य आणि विदर्भाची स्थिती काय?

राज्यात आणि प्रामुख्याने विदर्भात गेल्या काही वर्षांत वाघाच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. यात मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी झाली आहे. प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात मनुष्यहानीच्या घटना अधिक आहेत. मात्र, अलीकडच्या दोन वर्षात पेंच व्याघ्रप्रकल्पात देखील मानव वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

देशाची स्थिती काय?

भारतात गेल्या पाच वर्षांत वाघाच्या हल्ल्यात एकूण ३०२ माणसे मृत्युमुखी पडली. त्यापैकी ५५ टक्के मृत्यू केवळ महाराष्ट्रात झाले आहेत. केंद्राने पीडितांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून २९.५७ कोटी रुपये वितरित केले आहेत. २०२३ मध्ये भारतातील एकूण १६८ वाघांच्या मृत्यूपैकी सर्वाधिक ५२ मृत्यू देखील महाराष्ट्रातच झाले आहेत.

हेही वाचा – चर्चा तर होणारच! जाहिरातीच्या माध्यमातून भाजपचे मित्र पक्षावर दबावतंत्र…

वर्षनिहाय मृत्यू?

२०२२ मध्ये ११२ जण, २०२१ मध्ये ५९ जण, २०२० मध्ये ५१, तर २०१९ मध्ये ४९ जण आणि २०१८ मध्ये ३१ लोक वाघांच्या हल्ल्यामध्ये ठार झाले. या हल्ल्यांमध्ये केवळ महाराष्ट्रात १७० जण ठार झाले. त्यात २०२२ मध्ये ८५, २०२१ मध्ये ३२, २०२० मध्ये २५, २०१९ मध्ये २६ आणि २०१८ मध्ये दोन जण ठार झाले होते

इतर राज्याची स्थिती काय?

उत्तर प्रदेशात गेल्या पाच वर्षांमध्ये ३९ जणांना वाघाच्या हल्ल्यात प्राण गमवावा लागला, त्यात २०२१ व २०२२ मध्ये प्रत्येक वर्षाला ११ जणांनी, २०२० मध्ये ४ जणांनी, २०१९ मध्ये ८ जणांनी, तर २०१८ मध्ये पाच जणांनी प्राण गमावले. पश्चिम बंगालमध्ये २९ जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये वाघांच्या हल्ल्याशी संबंधित मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे. २०१९ मध्ये शून्य, २०२० मध्ये एक, २०२१ मध्ये चार आणि २०२२ मध्ये नऊ, अशी वाघाच्या हल्ल्यातील बळींची संख्या आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhandara district chandrapur district tiger attack review of maharashtra and vidarbha tiger attack incidents rgc 76 ssb