भंडारा : जिल्ह्यातील मुरमाडी सावरी या छोट्याशा गावात राहणाऱ्या भावना भलावे यांनी काही वर्षांपूर्वी बचतगटाच्या माध्यमातून घरात पीठ गिरणी उद्योग सुरू केला. मात्र या गिरणीतल्या पिठात धावणारी बोटे कधीतरी हाय-टेक कृषी ड्रोन रिमोट कंट्रोल करतील असा विचारही भावना यांनी केला नसेल. छोट्याशा उद्योजिका असलेल्या लाखनी तालुक्यातील मुरमाडी सावरी येथील भावना रविशंकर भलावे यांना २०२४ मध्ये भंडारा जिल्ह्यातील पहिल्या आणि कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट ड्रोन पायलट होण्याचा मान मिळाला आहे.

शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास सुलभता येते. त्यातच पिकांवर फवारणीसाठी ड्रोनसारख्या आधुनिक तंत्राचा वापर आता शेतकरी करताना दिसत आहे. हे नवे तंत्रज्ञान अवगत करून शेतीत क्रांती घडवण्यासाठी महिलाही पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. दरम्यान, पुणे आणि नंतर गुजरातमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर केंद्र सरकारच्या ‘ड्रोन दीदी’ योजनेंतर्गत भंडाराची भावना ही पहिली प्रमाणित ड्रोन पायलट बनल्या. ड्रोन पायलट भावना यांचा हा प्रेरणादायी प्रवास.

गोंदिया जिल्ह्यातील मारेगाव हे भावना यांचे माहेर. त्यांनी तिरोडा येथील सी. जे. पटेल महाविद्यालयातून बी. ए. पर्यंतचे शिक्षण घेतले. वडिलांकडे शेती असल्याने शिक्षणासोबतच त्या शेतातही आवडीने काम करायच्या. २००८ साली तुमसर येथील रविशंकर भलावे या उच्च शिक्षित तरुणासोबत त्यांचा विवाह झाला. रविशंकर मुंबई बेस्ट कॉर्पोरेशन येथे कामाला असल्याने भावना यांनी लग्नानंतर दीड वर्ष मुंबईला काढले. “तेथे सोसायटीतील प्रत्येक महिलेला उद्योग करताना पाहून उद्योग करण्याची प्रेरणा मिळाली आणि पतीनेच माझ्या पंखांना बळ देत भरारी घेण्यासाठी सक्षम केले” असे भावना सांगतात. त्यानंतर मुंबईची नोकरी सोडून भावना आणि रविशंकर मुरमाडी सावरी येथे स्थायी झाले.

मध्यमवर्गीय कुटुंबातील भावना संसाराला हातभार लावण्यासाठी कायम धडपडत होत्या. त्यातच त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून उद्योग करण्याचा निर्णय घेतला. २०१० मध्ये भावना यांना उमेद बद्दल माहिती मिळाली. तारेवरची कसरत करत महिलांना एकत्र आणून अखेर २०१८ मध्ये भावना या नव्या स्वयं सहाय्य महिला समूह बचतगटाची स्थापन केली आणि यांच्या लघु उद्योगाला सुरुवात झाली. नोकरवर्गातील महिलांची संख्या अधिक असल्यामुळे त्यांच्याकरीता पॅकेटबंद कणिक, विविध तृणधान्य प्रिमिक्स आणि नवनवीन प्रॉडक्ट तयार करण्याचे व मार्केटिंगचे प्रशिक्षण लाखनी व भंडारा येथे घेतले. २०१९ मध्ये त्या ग्रामसंघ अध्यक्ष झाल्या.

पुढे उद्योग व उत्पन्न वाढविण्यासाठी एक लाखाचे कर्ज काढून भावना यांनी नवीन मशिनरी खरेदी केल्या व ‘सखी गृह उद्योग’ची स्थापना २६ नोव्हेंबर २०२१ ला केली. नवनवीन प्रॉडक्ट जसे ढोकळा, इडली, भाकरीपीठ, गहूसोजी, चकली, आटा, पापड, वडी, सांडगे, लोणचे, दही मिर्ची व सणासुदीच्या वेळी दिलेले ऑर्डर घरपोच देऊ लागल्या. विशेष म्हणजे भावना सायकलने घरोघरी जाऊन त्यांचे प्रॉडक्ट देत असत. कृषी विभागांतर्गत जिल्ह्यात त्यांचे प्रॉडक्ट विक्रीकरिता ठेवले. सुरुवातीला मला ३ ते ४ हजार रुपये नफा मिळत होता पण दिवसागणिक त्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. त्यांच्या ‘सखी गृह उद्योग’च्या प्रोडक्टला ग्राहकांमध्ये पसंती मिळत आहे.

उद्योगाची अशी वाटचाल सुरू असताना एके दिवशी उमेद तालुका अभियानातील व्यवस्थापक तलमले यांनी भावना यांना नवीन शेती फवारणी यंत्र प्रशिक्षणाकरिता पुणे येथील ड्रोन सेंटर, सासवड येथे त्यांची निवड झाल्याचे सांगितले. विशेष म्हणजे मागासवर्गीय जिल्हा अशी ओळख असलेल्या जिल्ह्यातून महिला ड्रोन पायलट मिळणे जिकिरीचे होते. जिल्ह्याबाहेर प्रशिक्षण, होणारी परीक्षा यामुळे कोणी महिला पुढे येण्यास धजावत नव्हत्या. मात्र मनात भीती असतानाही भावना यांनी यासाठी तयारी दर्शवत परीक्षा दिली. या परीक्षेत पास होऊन जिल्ह्यात ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी निवड झाली.

प्रशिक्षणाला जाण्याकरिता त्यांच्या पतीने त्यांना प्रोत्साहन दिले. सासवड पुणे येथे त्यांचे दहा दिवसांचे प्रशिक्षण झाले. या प्रशिक्षणात प्रत्येक जिल्ह्यातून एक याप्रमाणे २० महिलांची अशी एक बॅच तयार करण्यात आली होती.

पुण्यात जानेवारी महिन्यात १५ दिवसांचे प्रशिक्षण, फेब्रुवारीत सातारा येथे ३ दिवसांचे प्रशिक्षण झाले. यानंतर गुजरातमध्ये भरगच्च कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पीएम नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित होते. याचवेळी एकाचवेळी एक हजार ड्रोन उडविण्याचे प्रात्यक्षिक पार पडले. या प्रात्यक्षिकात सहभागी होण्याचा मान मिळाल्याचे भावना यांनी सांगितले. संपूर्ण देशातील १०७९ ड्रोन दिदी मधील भंडारा जिल्ह्यातील पहिली प्रमाणित महिला ड्रोन पायलट, नमो ड्रोन दीदी स्वामित्व प्रमाणपत्र देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकार कृषी विभाग यांच्या हस्ते गौरविण्यात आले. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनीने मिडीयम कॅटेगिरीचे ड्रोन घरपोच उपलब्ध करून दिले. या ड्रोनद्वारे शेतीवर फवारणी करून उद्योग वृद्धिंगत होत आहे.

सहा महिन्यांपूर्वी भावना यांच्या पतीचे अपघाती निधन झाले. पतीच्या आकस्मिक निधनानंतर यश आणि धवल या दोन मुलांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मात्र खचून न जाता त्या मोठ्या नेटाने आणि धडाडीने त्यांचे काम करीत आहे.

ग्रामीण भागातील महिला देखील चूल मूल सांभाळून इतर कामे करत असतात. मात्र काही वेळा तांत्रिक काम करताना अडचणी येतात. मात्र अडचणींवर मात करत भलावे यांनी हे आव्हान यशस्वीरीत्या पेलले. आज कृषी क्षेत्रात नव्या पद्धतीचा अवलंब करणाऱ्या भावना इतर महिलांसाठी प्रेरक उदाहरण ठरली आहे. रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकांवर औषध फवारणी आवश्यक असते. यासाठी वेळ, खर्च, मनुष्यबळाची नितांत आवश्यकता असते. मात्र सद्यस्थितीत शेती व्यवसायासाठी ड्रोन माध्यम वरदान ठरत आहे. ड्रोनच्या माध्यमातून औषध फवारणी पिकांसाठी पोषक आणि उत्पादन वाढीसाठी उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. शिवाय औषध फवारणीचा खर्चही वाचवता येत आहे असे भावना सांगतात.