भंडारा : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून तब्बल सव्वामहिना लोटला आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनही झाले. नवीन वर्ष उजाडण्यापूर्वी पालकमंत्रीपदाची घोषणा होणार, असे सांगितले जात होते. मात्र अद्याप पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा झालेली नाही. त्यामुळे भंडारा जिल्ह्याचे पालकत्व कोणाकडे जाईल, असा प्रश्न आता विचारला जात आहे. जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री देण्यात यावा यासाठी शिंदे सेनेचे आमदार भोंडेकर यांची आग्रही भूमिका घेतली होती. आता भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या असून अखेर प्रफुल्ल पटेलांनी जिल्ह्यात स्वतःचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी हा खटाटोप केल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे पटेलांचा हा हुकुमी एक्का कोण याची उत्सुकता वाढली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार हाही विषय मार्गी लागला असताना कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असणार हा प्रश्न चर्चेला आला होता. भंडारा जिल्ह्याला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळाले नाही. त्यामुळे स्थानिक पालकमंत्री होण्याची आशा पार मावळली. त्यामुळे बाहेरील व्यक्तीच पुन्हा पालकमंत्री होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, दोन दशकानंतरही स्थानिक पालकमंत्री मिळण्याची जिल्ह्याची अपेक्षा कायमच राहणार आहे. दरम्यान जिल्ह्याचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे खेचून आणण्यात यश आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – चंद्रपूर : क्रौर्याची परिसीमा… क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन मुलाची दगडाने ठेचून हत्या

महायुतीमध्ये खातेवाटपाच्या तिढ्यानंतर पालकमंत्रीपदावरून तिढा निर्माण झाला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तोडगा काढत संभाव्य पालकमंत्र्यांची यादी तयार केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. महायुतीमधील तिन्ही पक्षांनी दावे केले होते. काही जिल्ह्यांवर दोन पक्षांमध्ये चढाओढ लागली होती. यावरून दावे-प्रतिदावे सुरू होते. मात्र आगामी पालिका निवडणुकांचे गणित लक्षात घेऊन पालकमंत्री निश्चित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी चर्चा करून पालकमंत्र्यांची नावे निश्चित केली असून लवकरच घोषणा करण्यात येईल. नगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमधील पक्ष स्वबळावर लढणार असल्याची शक्यता आहे. या शक्यता लक्षात घेऊनच तिन्ही पक्षांनी आपल्याकडे महत्त्वाचे जिल्हे यावेत यासाठी जोर लावला. अशातच आता राज्यातील संभाव्य पालकमंत्र्यांची यादी समोर आली असून भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेले असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – VIDEO : अवैध वाळू व सुपारी तस्करांवर आमदाराकडून छापा, नागपुरातील केळवद परिसरात…

देवेंद्र फडणवीस यापूर्वी मुख्यमंत्री असताना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मात्र या वेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे ते भंडाऱ्यासाठी उत्सुक नसल्याचे दिसत आहे. विद्यमान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेही नाव भंडाऱ्यासाठी चर्चेत आहे. यापूर्वी त्यांनी भंडाऱ्याचे पालकमंत्रीपद भूषविले आहे. त्यांना भंडाऱ्याची जाण असल्याने त्यांच्याकडे हे पद जाईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र त्यांच्या नावाची चर्चा आता नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी होत आहे. राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांचेही नाव भंडाऱ्यासाठी घेतले जात होते. मात्र आता हे पद अजित पवारांनी स्वतःकडे घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhandara district guardian minister ajit pawar ncp praful patel ksn 82 ssb