भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारी २०२१ रोजी पहाटे लागलेल्या भीषण आगीत ११ बालकांचा दूर्वैवी मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला होता. चौकशी अंती या प्रकरणात तीन परिचारिकांना दोषी ठरविण्यात आले होते. भंडारा पोलीस ठाण्यात ३०४ या कलम अन्वये या तीन या परिचारिकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने सदोष मनुष्यवधाऐवजी ३०४ (ए) या कलमानुसार आरोप निश्चित केला होता. मात्र या विरोधात प्रमुख परिचारिका ज्योती बारसागडे यांनी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्याला दोषमुक्त करण्यात यावे, अशी विनंती केली होती. उच्च न्यायलयाने ही याचिका फेटाळली असून ३०४ (ए) या कलमानुसार आरोप कायम करीत पुढील न्यायालयीन प्रक्रिया चालेल असे आदेश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या आगीच्या घटनेत अकरा नवजात बाळांचा मृत्यू झाला होता. चौकशीअंती शुभांगी साठवणे आणि स्मिता आंबिलढुके या दोन परिचारिकांसह प्रमुख परिचारिका ज्योती बारसागडे अशा तीन परिचारिकांना दोषी ठरविण्यात आले. तिघांविरुद्ध भंडारा पोलिस ठाण्यात कलम ३०४ अर्थात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात कलम ३०४ खारीज करीत कलम ३०४ (ए) म्हणजेच निष्काळजीपणामुळे मृत्यू या कलमंतर्गत तीनही परिचारिकांवर सुनावणी सुरू झाली.

दोषी तीन परिचारिकांपैकी प्रमुख परिचारिका ज्योती बारसागडे यांनी ‘घटनेच्या वेळी मी कामावर नसल्याचे सांगत मला दोषमुक्त करण्यात यावे’ अशी याचिका जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केली. मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने ती फेटाळली. त्यांनतर बारसागडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयायाने यावर सुनावणी करताना ३०४ (ए) नुसार दोष सिद्ध होत असल्याचे सांगून याचिका फेटाळली. त्यामुळे या घटनेतील दोषी तीनही परिचारीकांवर यापुढे ३०४ (ए) या कलमानंतर्गत खटला चालेल.