भंडारा : भंडारा वन परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या झिरी जंगलाजवळ मातोरा गावातील करचखेडा कालव्याजवळील शेतात शुक्रवारी राजेश सेलोकर यांच्यावर हल्ला करून त्यांचा जीव घेणारा वाघ शनिवारी सरपेवाडा गावातील तलावाजवळ दिसला. ही बातमी पसरताच परिसरात मोठी गर्दी झाली.
लोक मोठ्या संख्येने तेथे पोहोचले आणि वाघाला पाहण्यासाठी गोंधळ घालू लागले. भंडारा शहरातूनही शेकडो लोक वाहनांसह दाखल झाले. त्यामुळे परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली. लोकांचे हे अनियंत्रित वर्तन वनविभाग आणि वाघाच्या सुरक्षेसाठी आव्हान ठरले. भंडारा प्रादेशिक वन विभाग आणि कोका एसटीपीएफ (स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स) च्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण बेशिस्त जमाव त्यांचे ऐकायला तयार नव्हता.
भंडारा : भंडारा वन परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या झिरी जंगलाजवळ मातोरा गावातील करचखेडा कालव्याजवळील शेतात शुक्रवारी राजेश सेलोकर यांच्यावर हल्ला करून त्यांचा जीव घेणारा वाघ शनिवारी सरपेवाडा गावातील तलावाजवळ दिसला. ही बातमी पसरताच परिसरात मोठी गर्दी झाली.https://t.co/2jrmCKw8Ui pic.twitter.com/j1nxG59Otz
— LoksattaLive (@LoksattaLive) January 26, 2025
पर्यावरणप्रेमींची नाराजी
या घटनेबाबत पर्यावरणप्रेमी व वन्यजीव संरक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणतात की, लोकांचे असे वर्तन वाघासाठी तर धोकादायक आहेच पण माणसांच्या जीवालाही हानी पोहोचवू शकते. यामुळे वन्यजीव संरक्षणाच्या प्रयत्नांना हानी पोहोचू शकते. वाघाच्या संरक्षणासाठी वनविभागाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. अशा घटना रोखण्यासाठी जनजागृती मोहीम आणि कडक कायदे राबविले पाहिजेत, जेणेकरून मानव आणि वन्यजीव यांच्यातील समतोल राखता येईल, असे ते म्हणाले. मानवभक्षक वाघाची सुरक्षा आणि अनियंत्रित गर्दीची परिस्थिती हाताळणे हे वनविभागासमोर आव्हान आहे. वनविभागाने लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून वाघाला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.