भंडारा : जिल्ह्यात यावर्षी एप्रिल महिन्यापासूनच सूर्य आग ओकू लागला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाने ४० ची सीमा ओलांडली असून आज ५ एप्रिल रोजी तापमान ४३ अंश सेल्सिअसच्यावर नोंद झाली आहे. हे तापमान आणखीन वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या राज्यात उष्णतेची लाट पसरली असून भंडारा जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पारा ४३ अंशावर पोहोचला आहे. मागील पाच वर्षात पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा एवढा चढला आहे. भंडारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने दिलेल्या माहितीनुसार, २७ मे २०१९ मध्ये सर्वाधिक ४६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली होती. सन २०२० आणि २०२२ मध्ये मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसवर पोहचले होते तर २०२१ आणि २०२३ मध्ये मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सर्वाधिक ४४ अंश सेल्सिअस तापमान एवढी नोंद घेण्यात आली होती. त्यामुळे यंदा एप्रिल महिन्यात चढलेला तापमानाचा पारा जिल्हावासियांसाठी तापदायक ठरणार आहे.

हेही वाचा…नाना पाटोलेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी, कोण म्हणाले असे वाचा सविस्तर

सकाळी ७ वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा जाणवू लागत आहेत. सकाळी ११ वाजल्यापासूनच रस्त्यांवर कर्फ्यूसारखे वातावरण दिसत आहे. या उकाड्यामुळे मात्र सर्वांच्या जीव कासावीस झाला आहे. त्यात दिवसभरात अनेकदा होत असलेल्या भार नियमनामुळे नागरिकांचा जीव मेटकुटीस आला आहे. कधी या उकाड्यापासून सुटका केव्हा मिळते, याची सर्वच वाट बघत आहेत. मात्र अजून दोन महिने बाकी असल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. उन्हापासून संरक्षणासाठी लोकांची आईसक्रीम, लिंबुपाणी, ज्युस अशा शीतपेयांच्या गाड्यांवर गर्दी वाढली आहे.

निसर्गाने उन्हाळा, हिवाळा व पावसाळा असे तीन ऋतूंचे चक्र बांधून दिले आहे. मात्र वाढते सिमेंटचे जंगल आणि वृक्षांचे कमी होत चाललेले प्रमाण हे तापमान वाढीस कारणीभूत ठरत आहे. ऋतूचक्र व निसर्गावर सुध्दा याचा परिणाम होत आहे. पावसाळ्यात पाऊस पडत नाही. उन्हाळ्यात रविराज सीमा तोडून आग ओकू लागले आहे. पर्यावरणाशी माणूस जो खेळ खेळत आहे त्याची प्रतीपूर्ती निसर्गाकडून केली जात आहे. उन्हाळ्यात कधी मे महिना तापत असताना आता मात्र मार्च महिन्यापासून सूर्यदेव आग ओकत आहेत. यंदाचीच स्थिती बघितल्यास एप्रिल महिन्यानेच सर्वांना होरपळून काढले आहे. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्याचे तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या घरात गेले आहे. यावरून मे महिन्यात पडणारी उन्ह आता त्यापूर्वीच पडू लागल्याचे आहे. विशेष म्हणजे, सध्यातरी ४३ अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमान असले तरी एप्रिलचे तीन आठवडे, मे आणि जून महिना शिल्लक आहे. त्यामुळे मे आणि जून महिन्यात तापमानात वाढ होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही असे निर्देश हवामान खात्याने दर्शविले आहे.

हेही वाचा…केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हरले तर सर्वात जास्त दुःख नाना पटोले यांना…, वंचितचे राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे यांचा टोला

सध्या जिल्ह्यात तीव्र उष्ण लहरी प्रवाहित होत असल्याने उष्माघाताचा धोका नाकारता येत नाही त्यामुळे नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी केले आहे. उपाययोजना म्हणून दुपारी १२ ते ४ वाजता दरम्यान उन्हात निघणे टाळावे, उन्हात निघत असताना डोके, कान, नाक कापडाने झाकूनच बाहेर निघावे, चहा, कॉफी व कॅफीनयुक्त शितपेय घेणे टाळावे, मुबलक प्रमाणात पाणी प्यावे, तब्येत अस्वस्थ वाटल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, उष्माघातग्रस्त व्यक्ती आढळल्यास तात्काळ १०८ वर संपर्क करावा असे आवाहन अभिषेक नामदास यांनी केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhandara district swelters as temperature hits 43 degrees celsius early in april ksn 82 psg