भंडारा : निवडणूक जिंकण्यासाठी काही अती महत्वाकांशी उमेदवारांनी आता साम, दाम, दंड, भेद वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी अन्य उमेदवारांना निवडणुकीच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याची धमकी सुध्दा दिली जात आहे. एका अपक्ष उमेदवाराला देखील अर्ज मागे घेण्याच्या आदल्या रात्री अशाच प्रकारे आलेल्या धमकीवजा फोनमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून उमेदवारांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरले आहे. भंडारा जिल्ह्यात प्रथमच असा प्रकार घडला आहे. धमकी देणाऱ्या विरोधात पोलीस तक्रार करण्यात आली असून उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन देवून अर्ज मागे घेण्याची परवानगी मागितली. मात्र नामांकन मागे घेण्याची वेळ निघून गेल्यामुळे उमेदवाराची मागणी खारीज करण्यात आली. आता भीतीपोटी या उमेदवाराला प्रचारासाठी घराबाहेर पडणे अशक्य झाले असून प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी उमेदवाराने केली आहे.
भंडारा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या कपिल भोंडेकर यांना अर्ज मागे घेण्याच्या आदल्या रात्री एक धमकीवजा फोन आला. निवडणुकीतून माघार घेतली नाही तर जिथे दिसेल तिथे जीवे मारण्याची आणि कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याची धमकी देण्यात आली. याबाबत कपिल यांनी भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. कपिल भोंडेकर यांनी मंगळवारी सायंकाळी परिषदे दरम्यान ही माहिती दिली.
हेही वाचा…निवडणुकीच्या धामधुमीत वीज यंत्रणा विस्कळीत होणार? महावितरणमधील वाहन पुरवठादार…
u
विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे वातावरण चांगलेच तापत चालले आहे. मतदारांसोबत रिंगणात प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवारांनाही उमेदवारी मागे घेण्यासाठी काही उमेदवारांकडून दबाव आणला जात आहे. जे उमेदवार कोणत्याही अमिषाला बळी पडत नाहीत त्यांच्यावर धमकीचा प्रयोग केला जात आहे. भंडारा विधानसभेत निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या कपिल भोंडेकर यांना अशाचप्रकारे धमकी देण्यात येत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अज्ञात व्यक्तींकडून असे धमकीचे फोन येत असून याचा खरा सूत्रधार शोधून कठोर कारवाई करून कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी कपिल यांनी केली आहे.
कपिल सदालाल भोंडेकर हे गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील चांदोरी गावचे रहिवासी आहेत. त्यांनी भंडारा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. सोमवार, ४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.५५ वाजता एका अज्ञात नंबरवरून त्यांना फोन आला. अनोळखी नंबर असल्याने त्यांनी कॉल उचलला नाही. थोड्याच वेळात त्यांना त्याच मोबाईल क्रमांकावरून त्यांना धमकीवजा मेसेज आले. त्यांनी त्या मेसेजकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यानंतर त्यांच्या वडिलांच्या मोबाईलवर मेसेज आले, ” कुठे आहेस, भंडाऱ्यात येऊन राजकारण करतोस, तुला भंडाऱ्यामध्ये मरायचे आहे का, तुला जास्त खाज आली का? मी तुला सुपारी देऊन मारीन. तुमच्या पोटात दोन-चार हत्यारे टाकू, तुझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करून टाकू, माघार घेतली नाही तर जिथे दिसेल तिथे ठार मारू” अशी धमकी देण्यात आली. घडलेल्या प्रकाराची माहिती भंडारा पोलिसांना देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यानंतरही कायदा हातात घेतला जात असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
भंडारा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीवर बळाचा आणि दबाव तंत्राचा वापर करून प्रभाव पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही अतीमहत्वकांक्षी उमेदवारांनी असे प्रकार सुरू केले आहेत. कपिल भोंडेकर यांच्याप्रमाणेच इतरही काही कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना संपवण्याच्या धमक्या मिळाल्याचे वृत्त आहे. मंगळवारी दिवसभर याबाबतचे वृत्त सुरूच होते. काही लोक केवळ निवडणुकीपुरते मर्यादित ठेवून पोलिस तक्रार देण्यास टाळाटाळ करत आहेत. आज सकाळी कपिल भोंडेकर यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून एक गनमॅन देण्यात आला आहे मात्र तरीही भीतीपोटी प्रचारासाठी घराबाहेर पडणे अशक्य होत असल्याचे कपिल यांनी आज ‘लोकसत्ता’ला सांगितले.