भंडारा : विदर्भातील सर्वात मोठ्या इंदिरासागर गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी झालेल्या पावसामुळे धरण पातळीत वाढ झाली असून आज धरणाची १९ वक्रदारे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत.

या १९ वक्रदारातून २२१४.१२ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून धरणाच्या खालून वाहणाऱ्या वैनगंगा नदीमध्ये होत आहे. त्यामुळे पूर्णपणे सुकून गेलेली वैनगंगा नदी भरून वाहत आहे. काल सायंकाळपासून गोसीखुर्द धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात व नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे खुर्द धरणातील जलस्तर वाढण्यास सुरवात झाली होती. धरणाच्या बुडीत क्षेत्रातील कोणत्याही गावाला धोका होवू नये याकरीता १९ वक्रदारे ३२.०५ मी.ने उघडण्यात आली आहेत. त्यामुळे बुडीत क्षेत्रातील कोणत्याही गावाला धोका नाही. आज दुपारनंतर धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात कमी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – पती दारू पिऊन द्यायचा त्रास, संतापलेल्या पत्नीने कोंबडी कापण्याची सुरी उचलली आणि…

जलवाहिनी फुटली; लाखो लीटर पाणी वाया

भंडारा : शहरातील यशोदा नगर परिसरात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून जवळच असलेल्या नाल्यातून पाणी वाहून गेले. विशेष म्हणजे उन्हाळ्यात अनेकदा या भागात टँकरने पाणीपुवठा करण्याची वेळ येते. ज्या भागात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो त्या भागात अशाप्रकारे पाण्याची नासाडी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. एनकॅप निघाल्यामुळे नवीन जलवाहिनी फुटल्याचे सांगण्यात येत असून त्यामुळे फवारा तयार झाला. या प्रकारामुळे अर्धा रस्ता पाण्यात खचला.

सध्या शहरात जलवाहिनी टाकण्याचे काम अनेक प्रभागांमध्ये सुरू आहे. शहरातील खात रोड येथेही अनेक ठिकाणी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असून यशोदा नगर येथे महिनाभरापूर्वी नगर पालिकेने जलवाहिनी टाकली आहे. या परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या अंदाजे साडेसात लाख लीटर पाणी साठवणूक क्षमता असलेल्या दोन पाण्याच्या टाक्या आहेत. या दोन्ही टाक्यांमध्ये याच जलवाहिनीच्या माध्यमातून पाणी भरले जाते. उन्हाळ्यात परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याने पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी येथे नवीन पाईप लाईन टाकण्यात आली. मात्र, आज सकाळी अचानक या जल वहिनीची एनकॅप निघाल्याने पाण्याचा जोरदार फवारा निघू लागला.

हेही वाचा – बुलढाणा : फवारणीतून विषबाधा! चोघे अत्यावस्थ, एकाचा मृत्यू

पाण्याच्या वेगामुळे रस्ता खचून रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला. चार ते पाच तास पाणी वाहत राहिल्याने लाखो लीटर पाणी नाल्यात वाहून गेले. परिसरातील नागरिकांनी याबाबत माहिती देताच नगर पालिका कर्मचाऱ्यांनी येऊन एनकॅप लावली. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.