गोंदिया : राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागाला यंदाची दिवाळी भरभरून पावली. १ ते ३० नोव्हेंबर या दिवाळीच्या महिनाभरात १२ कोटी ९१ लाख रुपयांचे उत्त्पन्न मिळाले. यात भंडारा विभागातील भंडारा, तुमसर, साकोली, पवनी, गोंदिया व तिरोडा या ६ आगारांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भंडारा विभागातील या सहाही आगारात बसेसच्या दैनंदिन १८५० नियमित फेऱ्या आहेत. यात शालेय विद्यार्थ्यांच्या बसेसचाही समावेश आहे. यंदा दिवाळीच्या विद्यार्थ्यांची सुटी लक्षात घेऊन खास दिवाळीसाठी नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार दैनंदिन १७५० फेऱ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. यात कधी १.२८ तर कधी १.३२ लाख कि.मी. अंतर गाठण्यात आले असून सरासरी १.३० लाख कि.मी. चा एस.टी.ने प्रवास केला आहे.

हेही वाचा – यवतमाळ : गांजा विक्री व सेवनप्रकरणी २२ वर्षांत प्रथमच ६९ कारवाया

यंदाच्या दिवाळीत ९८ लाखांची भर

मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या दिवाळी उत्त्पन्नात ९८ लाखांची भर पडली आहे. मागीलवर्षी दिवाळीच्या काळात ११ कोटी ९३ लाख रुपये उत्त्पन्न मिळाले तर यावर्षी १२ कोटी ९१ लाख रुपयांचे उत्त्पन्न दिवाळीच्या १ महिन्यात मिळाले. यात लांब पल्लाही सुखावणारा ठरल्याचे दिसून आले. भंडारा आणि गोंदिया आगारातून लांब पल्ल्याच्या मार्गावर ४०० फेऱ्या असून यात अमरावती, परतवाडा, यवतमाळ, अहेरी उमरखेड, अकोला, शेगाव असे लांब पल्याचा समावेश आहे. याशिवाय पुणे बस असून पुणे फेरीतून दिवाळीला ५ लाख रुपयांचे उत्त्पन्न मिळाले.

तिकीट दरवाढीचा प्रवाशांवर परिणाम नाही

खासगी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांकडून नेहमीच हंगामात वाढणारी प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन तिकीट दरात वाढ केली जाते. यंदा एसटीनेही हा फॉर्म्युला वापरत गर्दीला ‘कॅश’ मध्ये रूपांतरित करून घेतले. दरवेळीप्रमाणे एसटीने दिवाळीआधी तिकीट दरात १० टक्के वाढ केली होती; मात्र, या दरवाढीचा कोणताही परिणाम प्रवाशांवर झाला नाही, उलट यंदा प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा – भंडारा : प्रेमात अडसर ठरणाऱ्या पहिल्या प्रियकराचा दुसऱ्या प्रियकराबरोबर मिळून काढला काटा; त्रिशंकू प्रेमातून नयनची हत्या

महिलांचा प्रवास लक्षणीय

१२ ते १७ नोव्हेंबर या आठ दिवसांत भंडारा विभागात २.७३ लाख महिलांनी प्रवास केला. यात आठ दिवसांत महामंडळाला ९३ लाख १५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. यात साकोली आगारातून २१.३४ लाख रुपयांचे सर्वाधिक उत्पन्न मिळाले. भंडारा आगारातून १९.५७ लाख तर तुमसर आगारातून ११.५७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

आगार निहाय उत्पन्न

भंडारा २.६५ कोटी
गोंदिया २.३० कोटी
साकोली ३.०३ कोटी
तिरोडा १.४२ कोटी
तुमसर २.५४ कोटी
पवनी ९६.५२ लाख

एकूण १२.९१ कोटी

“दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिवाळीनिमित्त परिवहन मंडळाला जादा प्रवासी वाहतुकीसाठी अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे सर्व प्रवासी बांधव भगिनींना सुविधा मिळाली. सोबतच महामंडळाच्या उत्पन्नात भर पडून विभागातील सहाही आगार नफ्यात आले आहेत.” – तनुजा अहिरकर, विभागीय नियंत्रक भंडारा.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhandara division of st corporation had great diwali this year during month of diwali an income of rs 12 crore 91 lakh was received sar 75 ssb
Show comments