भंडारा : भंडारा- गोंदिया मतदार संघात मी पाच वर्षांत केलेल्या कामाची पावती मला उद्या मिळणार यात तिळमात्र शंका नाही. एक्झिट पोल सांगतोय म्हणून नव्हे तर त्या आधीपासूनच सहाही विधानसभा क्षेत्रात मी प्रचंड मताधिक्याने निवडून येणार हे निश्चित झाल्याचा दावा महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मतदानापासून निकालापर्यंतच्या तब्बल ४६ दिवसांच्या कालावधीत एकच चर्चा होती, ती म्हणजे भंडारा – गोंदियाचा खासदार कोण? प्रशांत पडोळे की सुनील मेंढे? मात्र नेत्यांपासून सर्वसामान्यापर्यंत याबाबत अंदाज बांधणे कठीण झाले आहे. सहाही विधानसभा मतदारसंघात झालेली मतदानाची टक्केवारी पाहता ही लढत चांगलीच रंगतदार होणार आहे. एक्झिट पोलबाबत सुनील मेंढे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले की, अनेकदा एक्झिट पोल हे ७० ते ८० टक्क्यांपर्यंत बरोबर असतात. त्यामुळे पोल समोर येताच काँग्रेस उमेदवाराचे धाबे दणाणले आहेत. त्यांना पराभव समोर दिसत असल्याने ते उगाच काहीतरी बरळत आहेत. माझ्या कामाची शिदोरी माझ्यासोबत आहे त्यामुळे सहाही विधानसभा क्षेत्रात विक्रमी मतांनी विजयी होणार, असा ठाम विश्वास मेंढे यांनी बोलून दाखविला. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जनतेचा विश्वास असल्याने भाजप महाराष्ट्रात ३५ च्या वर जागा मिळवणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : बुलढाणा : प्रतापराव जाधव म्हणतात, ‘गड कायम’; खेडेकर म्हणतात, ‘परिवर्तन निश्चित’ तर तुपकरांचा ‘एक्झिट पोल’वर भरोसा नाही

गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव या विधानसभा मतदारसंघात मेंढेंचे पारडे जड, तर साकोली, भंडारा, तुमसर या विधानसभा क्षेत्रात पडोळेंचे पारडे जड असल्याची चर्चा मतदारांमध्ये आहे. शहरी भागात मेंढे तर ग्रामीण भागात पडोळेंना पसंती मिळाल्याचे बोलले जात आहे. मात्र सध्या कोणताही उमेदवार विजयी झाला तरी मोठया फरकाने होणार नाही, असे राजकीय विश्लेषक ठामपणे सांगत आहेत.

हेही वाचा : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणतात,‘जनतेच्या आशीर्वादाने लोकसभा जिंकणार’

निवडणुकीत मतदानाचा टक्का काही प्रमाणात घटला असला तरी महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मेंढे यांच्या विजयाचा विश्वास आहे. या दोन्ही जिल्ह्यातील सहा पैकी पाच आमदार सत्तेत आहेत. काँग्रेसने युवा उमेदवार दिल्यामुळे त्यांचा निभाव लागणार नाही, असे समीकरण आधी मांडले जात होते. परंतु, मतदान झाल्यावर मात्र, महायुती असो की आघाडी, विजयासाठी मोठी कसरत करावी लागणार यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाले. परिणामी, विजयाचे अंतर हजारांच्या आकड्यातच असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhandara gondia bjp mp sunil mendhe told that he will win lok sabha again with huge margin ksn 82 css
Show comments