कविता नागापुरे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भंडारा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील रणसंग्राम उमेदवार निश्चित नसतानाही राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. निवडणूक तारखा जाहीर होऊनही या मतदारसंघातील जागेचा तिढा सुटता सुटत नसल्याने इच्छुकांची कोंडी झाली आहे. महायुती व महाविकास आघाडी यांच्यातील रखडलेले जागावाटप व त्यामुळे निर्माण झालेला उमेदवारीचा सस्पेन्स यामुळे या मतदारसंघातील राजकीय अस्वस्थता कमालीची वाढली आहे.

येथे भाजपचे खासदार असताना प्रफुल पटेल त्यांच्या मर्जीतील उमेदवारासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच हा जागेचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपचे ‘कमळ’ फुलणार की राष्ट्रवादीच्या (अजित पवार) घड्याळाची टिकटिक होणार, हे चित्र स्पष्ट होण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ राज्याच्या राजकीय पटलावर लक्षवेधक ठरू लागला आहे. या मतदारसंघात महायुतीसह महाविकास आघाडीतील सर्वपक्षीयांनी मोचेर्बांधणीला सुरू केली आहे. मात्र युतीत भाजप आणि त्यांचा मित्र पक्ष अजित पवार गट यांच्यात या जागेसाठी ओढाताण सुरू असल्याचे बोलले जाते. या मतदारसंघामध्ये सन २००९ पासून भाजप- राष्ट्रवादीत मुख्यत: लढत झाली आहे.

आणखी वाचा- जावई बापूंचा पेच पवार सोडविणार की लेकीस पुढे करणार…

मात्र, राज्यातील सत्तांतरानंतर महायुतीत अजीत पवारांच्या राष्ट्रवादीने ए्ट्री केली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ९ जागांपैकी विदर्भातील तीन जागांसाठी अजित पवार गट आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये विदर्भातील भंडारा-गोंदिया, गडचिरोली व वर्धा लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. त्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात घड्याळाची टिक टिक वाजणार की भाजपाचे कमळ फुलणार? यावरून जिल्ह्यातील नेतेमंडळींसह नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

राष्ट्रवादीकडे चार जागा असून त्या जागांव्यतिरिक्त आणखी पाच जागांची मागणी अजित पवार गटाने केली आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे बारामती, सातारा, रायगड, शिरूर या चार लोकसभा मतदारसंघ आहेत. मात्र या व्यतिरिक्त अजित पवार गटाच्या वतीने धाराशिव, परभणी, दक्षिण मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि भंडारा गोंदिया या पाच मतदारसंघाची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र सध्या हा मतदार संघ भाजपच्या ताब्यात असल्याने तो राष्ट्रवादी साठी सोडेल का हा प्रश्नच आहे. मात्र सध्या भाजपचे “धक्कातंत्र” सुरू असल्याने भाजप ऐनवेळी काय निर्णय घेईल हे सांगणे आता राजकीय विश्लेषकानाही अशक्य झाले आहे. भाजपाने महायुतीतील आपल्या मित्रपक्षांपुढे एक फॉम्युर्ला ठेवला आहे. त्यात अनेक विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता असल्यामुळे महायुतीत लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून महाभारत घडण्याची शक्यता आहे. तरीही भाजपाच्या कोट्यातील ही जागा मोदींना पुन्हा पंतप्रधान पदावर आसनस्थ करण्यासाठी इलेक्टिव्ह मेरीटच्या आधारावर राष्ट्रवादीसाठी सोडली जाण्याची शक्यता राजकिय अभ्यासकांकडून वर्तविली जात आहे. असे असले तरी जो तो आपापल्या परीने अंदाज बांधू लागला आहे. मात्र उमेदवार निश्चितीनंतरच या मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

आणखी वाचा- यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाचा ९६ गावांना फटका; एकाचा मृत्यू, १२ जनावरे दगावली

भंडारा-गोंदियासाठी श्रेष्ठींकडून विचारमंथन…

२०२४ लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपा अंतिम टप्प्यात आली आहे. भाजपा पक्षश्रेष्ठींनी खासदारांचे काम, लोकप्रियता, संघाशी असलेले नाते, संघाकडून नावाबद्दल मिळणारा ‘ग्रीन सिग्नल’, सोशल माध्यमांवरील सक्रियता, निवडणूक लढविण्याची सर्वंकष क्षमता, स्थानिक पातळीवरील प्राबल्य, स्थानिक नेत्यांकडून मिळणारा पाठिंबा किंवा विरोध आदी बाबींचा आधीच कानोसा घेतला आहे. विदर्भातील अन्य लोकसभा मतदारसंघाप्रमाणेच भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांबाबातचे सर्वेक्षण अहवाल आधीच पक्षश्रेष्ठींपर्यंत गेले असून भंडारा-गोंदिया मतदारसंघांबाबत अद्यापही विचारमंथन सुरू असल्याची माहिती आहे.

काँग्रेसकडून दावा केला जाण्याची चर्चा…

बदललेल्या राजकीय परिस्थितीत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसकडूनही दावा केला जाऊ शकतो अशी चर्चा कार्यकत्यांमध्ये आहे. काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाºयांची बैठक झाली. या बैठकीत भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात आगामी निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार देण्याची मागणी केली गेली. काँग्रेस कार्यकत्यांचे म्हणणे जाणून घेत त्याबाबतचा अहवाल पक्षश्रेष्ठींना सादर करण्यात आला आहे. त्यामुळेच भविष्यात निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीचे नेते काय निर्णय घेणार? याकडे कार्यकत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhandara gondia constituency seat will go to bjp or ncp ajit pawar group ksn 82 mrj
Show comments