भंडारा : मतमोजणीनंतर भंडारा- गोंदिया लोकसभेसाठी काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे हे विजयी झाले असून त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे सुनील मेंढे यांचा ३५ हजार ४५६ मतांनी पराभव केला आहे. ३२ फेऱ्यांमध्ये झालेल्या मतमोजणीअंती निकाल स्पष्ट झाला. निकाल जाहीर होताच कोणत्या उमेदवाराने कोणत्या विधान सभा क्षेत्रात आघाडी घेतली याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. कारण आगामी विधानसभा निवडणुकीची समिकरणे या निकालावरून जुळवली जाणार आहेत. समोर आलेल्या आकडेवारीनंतर भाजप नेत्यांचे धाबे दणाणले असून आगामी विधान सभा भाजपसाठी धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, भंडारा जिल्ह्यात भाजपच भाजप उमेदवाराच्या पराभवास कारणीभूत ठरली आहे.
लोकसभेचा निकाल जाहीर होताच आता विधानसभेचे वादळ घोंगावू लागले आहे. महाराष्ट्रात विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपत असल्याने दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस विधान सभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे लोकसभेचा निकाल जाहीर होताच विधान सभेची आकडेमोड करण्यास सुरुवात झाली आहे. भंडारा गोंदिया मतदार संघात भंडारा, साकोली, तुमसर, अर्जुनी मोरगाव, तिरोडा आणि गोंदिया असे एकूण सहा विधानसभा क्षेत्र आहेत. सहापैकी भंडारा, साकोली, तुमसर आणि अर्जुनी मोरगाव या ४ विधानसभा क्षेत्रात डॉ. पडोळे यांनी तर गोंदिया आणि तिरोडा या २ विधान सभा क्षेत्रात मेंढे यांनी आघाडी घेतली. मागील वेळीच्या तुलनेत मेंढे यांना साधारणतः एक लाख मतांचा फटका बसला. ज्यात भंडारा जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मिळून सुमारे ५९ हजार मतांनी वजाबाकी झाली.
हेही वाचा: नेतृत्वाकडून कारवाईच्या भीतीने फडणवीसांचे राजीनाम्याचे नाटक – अतुल लोंढे
भंडारा जिल्ह्यातील भंडारा विधानसभेत सध्या अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर, तुमसर क्षेत्रात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आ. राजू कारेमोरे तर साकोली विधानसभेत नाना पटोले आमदार आहेत. लोकसभा निकालाअंती विधान सभा निहाय आकडेवारी बघता या तीनही विधान सभा क्षेत्रात काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा भाजप आणि एकंदरीतच महायुतीतील मित्र पक्षासाठी देखील मोठे आव्हान असणार आहे.
भंडारा – पवनी विधान सभा क्षेत्रात मेंढे तब्बल २३ हजार मतांनी मागे पडले. भंडाऱ्यात सुनील मेंढे मागे जाण्याचे मुख्य कारण भाजपच आहे. मेंढे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर नाराज झालेले भाजपचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी हेच कारणीभूत ठरल्याचे आता उघडपणे बोलले जात आहे. शिवाय मेंढे आणि डॉ. परिणय फुके यांच्यात अंतर्गत धुसफूस होतीच. त्यामुळे पक्षश्रेष्ठीसमोर एकत्र असल्याचा आभास निर्माण केला गेला तरी तिकीट न मिळाल्यामुळे फुके आणि त्यांच्या समर्थकांनी साथ दिलीच नाही. शिवाय शिंदे समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनीही मेंढेंना पाहिजे तशी साथ दिली नाहीच.
त्यामुळेच या विधान सभा क्षेत्रात मेंढे यांना तोंडघशी पडावे लागले. आता दुखावलेले मेंढे आगामी विधान सभा निवडणुकीत फुके आणि आ. भोंडेकर यांना साथ देतील का? शिवाय भंडाऱ्यात काँगेसची लीड बघता येथे आता अपक्ष उमेदवारलाही जड जाणार हे निश्चित. या ठिकाणी मतदारांनी देखील मेंढेंना नाकारले त्याचे मुख्य कारण म्हणजे पाच वर्ष नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांची निष्क्रियता. नगराध्यक्ष असताना त्यांनी कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाहीत. शहरातील रस्ते, पाणी, अतिक्रमण, पार्किंगची समस्या, उद्याने या सर्व बाबींना पूर्ण करण्यास ते सपशेल अपयशी ठरले. त्यामुळे मतदारांनीही येथे त्यांना नाकारले.
हेही वाचा: अमरावती : ‘इव्हीएम’वरील बटन दाबताना चित्रफित काढणे भोवले
विशेष म्हणजे प्रफुल पटेलांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. त्यामुळेच मेंढेंना विजयी करण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. स्वतः उमेदवार असल्याप्रमाणे त्यांनी मेंढेंचा प्रचार केला. मात्र त्यांच्याच सरदारांची निष्क्रियता मेंढेच्या पराभवास कारणीभूत ठरली. तुमसर आणि मोरगाव अर्जुनी या दोनही विधानसभेत मेंढे अनुक्रमे ९ हजार आणि २० हजार ८०० मतांनी वजा झाले. या दोन्ही विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असून त्यांची निष्क्रियताच मेंढेंच्या पथ्यावर पडल्याचे बोलले जाते. शिवाय पारंपरिक राष्ट्रवादीच्या निष्ठावंताची मतेही काँग्रेसकडे वळली. त्याचाही फटका भाजप उमेदवाराला बसला. या दोन आमदारांमुळे प्रफुल पटेलांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली ते वेगळेच.
याचे परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत नक्कीच दिसतील. या ठिकाणी महा विकास आघाडी चरण वाघमारे यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे आणि तसे झाल्यास तुमसर विधानसभा काबीज करणे महाविकास आघाडीला सहज शक्य होणार आहे. असे असले तरी पडोळेंची तुमसर क्षेत्रातील आघाडी पाहता चरण वाघमारे यांच्या विकास फाउंडेशनने साथ दिल्यानंतर पडोळे तुमसरमध्ये सर्वाधिक बहुमत घेतील हा समाज मात्र फोल ठरला आहे.
हेही वाचा: चंद्रपूर: कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक, भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
नानांचा गृहमतदार संघ असलेल्या आणि ‘रेकॉर्ड ब्रेक’ मतदान झालेल्या साकोली विधान सभा क्षेत्राकडे यावेळी सर्वांचेच लक्ष केंद्रित झाले होते. येथे डॉ. पडोळे यांनी सर्वाधिक २७ हजार ३०० ची आघाडी घेतल्याने नानांची जादू कायम असल्याचे सिद्ध झाले. विशेष म्हणजे भंडारा लोकसभा क्षेत्रात प्रचाराचे केंद्रबिंदू साकोली विधानसभा क्षेत्र होते. प्रचाराची खरी रणधुमाळी या क्षेत्रात दिसून आली. काँग्रेसचे राहुल गांधी आणि भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांची प्रचारसभा साकोलीतच झाली होती. साकोलीतील सर्वाधिक बावणे कुणबी यांची मते आणि या लाखनी व लाखांदूर तालुक्यातील झाडे कुणबी यांनीही नानांना कौल दिला. त्यामुळे नानांना आपला गड राखण्यात यश आले. या निमित्ताने नानांचे कट्टर प्रतिस्पर्धी डॉ. परिणय फुके यांचीही प्रतिष्ठा धुळीस मिळाली.
साकोलीला स्वतःची कर्मभूमी म्हणविणाऱ्या फुके यांना मेंढें येथे उभारी मिळवून देता आली नाही. साकोली विधान सभेत नानांचे श्रेष्ठत्व सिद्ध झाल्यानंतर आता आगामी विधानसभा डॉ. फुके लढतील का ? लढले तरी तग धरू शकतील का ? की काढता पाय घेतील हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीवर उमटणार हे मात्र निश्चित.
हेही वाचा: चंद्रपूर : १२ उमेदवारांना ‘नोटा’ पेक्षा कमी मते
महाविकास आघाडीचे डॉ. प्रशांत पडोळे ५ लाख ८१ हजार ६७८ मतांनी विजयी झाले तर महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांनी ५ लाख ४६ हजार २२२ मते घेतली. सन २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे सुनील मेंढे यांनी ६ लाख ५० हजार २४३ मते घेत तब्बल २ लाख मताधिक्याने विजय संपादन केला होता हे विशेष.